Mumbai Crime : मुंबईमध्ये सोमवारी मध्यरात्री दहिसरच्या कोकणी पाडा परिसरात धक्कादायक घटना घडली. दारूच्या व्यसनाधीन एका व्यक्तीने झोपेत असलेल्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला केला, तसेच तिला वाचविण्यासाठी धावून आलेल्या पत्नीला देखील ब्लेडने जखमी केले. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
हनुमंत सोनवळ (36) असे या आरोपीचे नाव असून, तो बराच काळ दारूच्या नशेत पत्नीवर संशय घेत मारहाण करीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या सततच्या अत्याचाराला कंटाळून पत्नी राजश्री यांनी वांद्रे कोर्टात घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली होती. त्या अनुषंगाने त्या सोमवारी नालासोपाऱ्यात वकिलांशी चर्चा करून घरी परतल्या, मात्र उशिराने घरी येण्यावरून हनुमंतने त्यांच्यावर आक्षेप घेतला. त्याने संतापाच्या भरात पत्नी आणि मुलीला ठार मारण्याची धमकी दिली होती.
रात्री साधारण सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. 14 वर्षीय मुलगी गाढ झोपेत असताना तिच्या गळ्याजवळ तीव्र वेदना जाणवल्या. काहीतरी चावल्यासारखी भावना झाल्याने ती दचकल्याचं समजताच, वडिलांनी ब्लेडने गळ्यावर गंभीर वार केल्याचे तिला लक्षात आले. ती प्राणांतिक वेदनेने ओरडू लागल्यावर आई राजश्री तिला वाचविण्यासाठी धावल्या. मात्र संतापलेल्या हनुमंतने त्यांच्यावरही ब्लेडने हल्ला करून पोटावर वार केला.
घटनेनंतर घाबरलेल्या परिवाराने आणि शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुलगी आणि आईला तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल केले. दोघींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
दहिसर पोलिसांनी आरोपी हनुमंत सोनवळला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न, घरगुती हिंसा आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून, कुटुंबातील दीर्घकालीन वाद आणि व्यसनाधीनतेमुळे शेवटी ही भीषण वेळ आल्याची भावना नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











