Mumbai Crime: मुंबई पोलिसांनी सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एका POCSO प्रकरणातील आरोपीला अटक केल्याची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि न्यूज नेटवर्कच्या मदतीने सलग 10 दिवस आरोपीचा शोध घेतला आणि अखेर त्याला अटक केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
संबंधित घटना 16 सप्टेंबर 2025 च्या रात्री विले पार्ले पश्चिम येथे घडली. संबंधित प्रकरणासंबंधी एका 52 वर्षीय तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, त्यांची दहावीत शिकणारी मुलगी जनरल स्टोअरमधून किराणा सामान खरेदी करून घरी परतत होती. दरम्यान, विले पार्ले येथील सेंट ब्रोन्झ रोडजवळ, एका अज्ञात तरुणाने अचानक तिच्या मागून येऊन पीडितेचा चेहरा झाकला. त्यानंतर तिचा विनयभंग केला आणि तिथून पळून गेला. पीडित मुलगी घरी परतली आणि तिने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली.
एफआयआर दाखल करून तपास सुरू...
तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये एका अज्ञात तरुणाविरुद्ध BNS च्या कलम 74, 78B आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8, 12 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आणि तपास सुरू करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार सावंत आणि संजय कल्हाटकर यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपींचे फोटो जवळच्या जुहू, वाकोला तसेच विलेपार्ले पोलीस ठाण्यांच्या पेट्रोलिंग टीमला पाठवले.
हे ही वाचा: प्रियकरासोबत विवाहित प्रेयसीचा ‘त्या’ कारणावरून वाद, रागाच्या भरात खलबत्त्याच्या दगडाने ठेचलं अन्...
चौकशीदरम्यान गुन्हा कबूल केला...
सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीची स्पष्ट ओळख पटली आणि तो जुहू पोलिस स्टेशन परिसरातील नेहरू नगरमध्ये वारंवार येत असल्याचं आढळून आलं. स्थानिक सूत्रांकडून आणि तपासाद्वारे पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली आणि त्याला जुहूच्या नेहरू नगर परिसरात ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्याने आपल्या गुन्ह्याची कबूली दिल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: पुणे: सहकारी तरुणीला प्रपोज केलं, पण नकार मिळताच प्रचंड संतापला! रागाच्या भरात फेक आयडी, अश्लील फोटोज अन्...
आरोपीची माहिती
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव पप्पू जागील नायक (20) असून तो विलेपार्ले पश्चिमेतील मिठीभाई कॉलेजच्या मागे असलेल्या परिसरात मजूर म्हणून काम करतो. तसेच, त्याचे मूळ गाव ओडिशातील गंजम जिल्ह्यातील बोरमपूर असल्याचं समोर आलं आहे. सांताक्रूझ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
