Mumbai News: मुंबईमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. आता मुंबईतील अंधेरी शहरातून डबल मर्डरचं प्रकरण समोर आलं आहे. येथे एका तरुणाने आपल्या वडील, काका आणि आजोबांवर जीवघेणा हल्ला केला आणि या हल्ल्यात आरोपीच्या वडील आणि आजोबांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. घटनेनंतर आरोपी तरुणाने कोणताही विचार न करता थेट पोलीस स्टेशन गाठलं. आरोपीने पोलिसांसमोर सरेंडर केलं आणि दररोजच्या जाचाला कंटाळून हे गुन्हा केल्याचं त्याने कबूल केलं. संबंधित तरुणाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
अंधेरीतील या डबल मर्डर केसमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (23 सप्टेंबर) मध्यरात्री ही भयानक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. प्रकरणातील 23 वर्षीय आरोपीचं नाव चेतन भात्रे असून तो डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. ही भयानक हत्या केल्यानंतर चेतनने बुधवारी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण लहानपणापासूनच त्याच्यासोबतच होणाऱ्या जाचाला वैतागला होता आणि याच रागाच्या भरात त्याने ही हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा: कोणीतरी अर्थमंत्री असताना लॉटरी घोटाळा झाला, देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने दबला; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
वडिलांसोबतचा वाद पेटला अन्
आरोपीने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, घटनेच्या दिवशी रात्री जवळपास 11 वाजताच्या सुमारास चेतन काम करून घरी परतल्यानंतर पैशांच्या कारणाववरून त्याचा वडिलांसोबत मोठा वाद झाला. त्यावेळी त्याचे आजोबा आणि काका सुद्धा वडिलांच्या बाजूने चेतनसोबत भांडू लागले. यामुळे आरोपी तरुण प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात त्याने किचनमधून चाकू आणला आणि आपल्या वडिलांवर हल्ला केला, त्यानंतर वडील रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडले. त्यावेळी चेतनने चाकूने आपल्या आजोबा आणि काकांवर सुद्धा हल्ला केला. या हल्ल्यात आरोपीच्या आजोबांचा देखील मृत्यू झाला आणि त्याचे काका गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा: India Today Conclave: 'त्या' ड्रेसवरून झालेली प्रचंड ट्रोलिंग, अमृता फडणवीसांनी आता कोणाला सुनावलं?
मुलाने केला गुन्हा कबूल
हत्येनंतर आरोपीने स्वत: एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपला गुन्हा कबूल केला. त्यावेळी त्याने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. या घटनेनंतर स्थानिकांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, आरोपीच्या आजोबांचा आणि वडिलांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. घटनेत गंभीर पद्धतीने जखमी झालेल्या पीडित काकांवर सुद्धा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
