Thane Crime: ठाणे जिल्ह्यातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील कल्याणमध्ये राहणाऱ्या एका 44 वर्षीय तरुणाने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी पीडित तरुणाने पत्नीला फोन केला आणि त्यावर आपण आयुष्य संपवत असल्याचं त्याने सांगितलं. गुरुवारी (25 सप्टेंबर) पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की 19 सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास संबंधित घटना घडली. घटनेच्या दोन दिवसांनंतर तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. धनाजी रघुनाथ शिंदे अशी मृताची ओळख झाली असून तो बदलापूरचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
आत्महत्येपूर्वी पत्नीला केला फोन
पडघा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी शुक्रवारी (19 सप्टेंबर) कल्याणच्या गंधारी नदीमध्ये उडी मारून स्वत:चं आयुष्य संपवलं. हे टोकाचं पाऊल उचलण्याआधी पीडित तरुणाने आपल्या पत्नीला फोन केला आणि त्यावेळी तो आत्महत्या करणार असून आता परत कधीच घरी परतणार नसल्याचं त्याने पत्नीला सांगितलं. तसेच, त्याने आपल्या पत्नीला मुलांकडे लक्ष देण्यास सांगितलं आणि त्यानंतर तरुणाने आपला फोन बंद केला.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता एकाच अॅपवरून काढता येणार मेट्रोची सर्व तिकीटे... कसं ते जाणून घ्या
स्थानिकांनी पोलिसांना दिली माहिती
घटनास्थळी उपस्थित असलेले स्थानिक मासेमार आणि प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेच्या दिवशी रात्री पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली एक व्यक्ती गंधारी ब्रिजवरून उडी मारताना दिसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. दरम्यान, पीडित तरुणाने आपल्या पत्नीला फोन केल्यानंतर पत्नी लगेच पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिने पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक मासेमाऱ्यांनी नदीमध्ये शोध मोहीम सुरू केली.
हे ही वाचा: तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार! शाळेत जाताना तिघांनी अडवलं अन् नंतर 'त्या' ठिकाणी नेऊन...
दोन दिवस मृतदेहाचा शोध घेतल्यानंतर रविवारी तरुणाचा मृतदेह नदीच्या किनारी सापडला. याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं की मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्याच्या आधी घटनास्थळीच पंचनाम्याची कारवाई पूर्ण करण्यात आली. कल्याणच्या खडकपूर पोलीस स्टेशनमध्ये प्रकरणासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आणि घटनेच्या तपासासाठी हे प्रकरण पडघा पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
