सिडनी: मुंबईकर रोहित शर्माने आज (25 ऑक्टोबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मैलाचा दगड गाठला आहे. भल्याभल्या क्रिकेटर्संना जे शक्य झालेलं नाही ते आज रोहितने करून दाखवलं आहे. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक झळकावले आहे. हिटमॅनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना आपला ठसा उमटवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अर्धशतक आणि तिसऱ्या सामन्यात शतक झळकावून, रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत हा पराक्रम करणारा तो जगातील फक्त 10 वा खेळाडू आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत कोणत्याही फलंदाजाने केलेले हे पहिले शतक आहे.
ADVERTISEMENT
रोहित शर्माने झळकावलं शतकांचं अर्धशतक
उजव्या हाताचा फलंदाज रोहित शर्माने अॅडलेडमध्ये अर्धशतक आणि नंतर सिडनीमध्ये एक शानदार शतक झळकावले, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे हे 50 वे शतक आहे. रोहितचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील (वन डे) 33 वे शतक आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 12 आणि टी-20 मध्ये 5 शतके झळकावली आहेत, ज्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या 50 झाली आहे. रोहितच्या आधी फक्त नऊ फलंदाजांनी 50 किंवा त्याहून अधिक शतके झळकावली आहेत. 49 शतकांसह 10 व्या क्रमांकावर असलेला डेव्हिड वॉर्नर आता 11 व्या क्रमांकावर घसरला आहे.
हे ही वाचा>> सचिन, द्रविडला जमलं नाही, ते रोहित शर्माने करुन दाखवलं, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला
रोहित शर्माने 63 चेंडूत सहा चौकार आणि एका षटकारासह अर्धशतक पूर्ण केले होते, परंतु त्याने शतक हे अवघ्या 105 चेंडूत 11 चौकार आणि दोन षटकारांसह पूर्ण केले. रोहित शर्मा 50 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा तिसरा भारतीय फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरने 100 शतके झळकावली आहेत आणि विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 82 शतके झळकावली आहेत. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा तिसरा फलंदाज आहे. अर्थात, या यादीत त्याच्या पुढे फक्त विराट आणि सचिन आहेत. विराटने 51 शतके झळकावली आहेत आणि सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतके झळकावली आहेत.
हे ही वाचा>> LBW चा नियम कधी लागू झाला? क्रिकेटमधील ही रंजक गोष्ट तुम्हाला माहितीए?
वयाच्या 38 व्या वर्षीही रोहितचा जलवा कायम
रोहित शर्माने वयाच्या 38 व्या वर्षी त्याचे 33 वे एकदिवसीय शतक झळकावले, या वयातही उत्कृष्ट कामगिरी करण्याची त्याची क्षमता त्याने दाखवून दिली आहे. रोहितला एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले असले तरी, ऑस्ट्रेलिया मालिकेतील त्याच्या फलंदाजीच्या कामगिरीवरून असे दिसून येते की त्याला एकदिवसीय संघातून वगळता येणार नाही.
ADVERTISEMENT











