Thane Crime : कल्याणमधील एका नामांकित शाळेचा नियम सध्या वादाचा विषय ठरत आहे. श्रीमती कांताबाई चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूल प्रशासनाने विद्यार्थ्यांनी कपाळावर टिळा किंवा टिकली लावणे, तसेच विद्यार्थिनींनी राखी अथवा धागा बांधणे यावर बंदी घातली आहे. यामुळे संतप्त पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली असून, शिक्षण विभागानेही शाळेला नोटीस बजावून कारवाई करण्याचे स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT
आमच्या धार्मिक परंपरांवर बंदी कशामुळे? पालकांचा सवाल
कल्याणमधील श्रीमती कांताबाई चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांसाठी घालून दिलेल्या विचित्र नियमामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी कपाळावर टिळा किंवा टिकली लावून शाळेत प्रवेश केल्यास कारवाई केली जाईल. हातात राखी किंवा धार्मिक धागा बांधला तर शिक्षा होईल, असा नियम शाळेने लादल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पालकांनी सवाल केला, की आम्ही इतर धर्माला बंदी घालतो का ? मग आमच्या धार्मिक परंपरांवर बंदी का ? असा सवाल करत पालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
हेही वाचा : आधी स्वत: लंडनला पळाला, आता कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कुटुंबातील सदस्यही फरार; मोठी अपडेट समोर
दरम्यान, वाद चिघळू नये म्हणून शाळेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शाळा सचिव मनोहर पालन, डायरेक्टर स्वप्नाली रानडे, मुख्याध्यापक संजय पाटील, पोलिस अधिकारी, पालक प्रतिनिधी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी रूपेश भोईर यांची बैठक झाली. या बैठकीत पालकांनी प्रशासनाला जाब विचारला, तर ठाकरे गटानेही इशारा दिला की जर कारवाई नाही झाली तर आंदोलन कारण्यात येईल.
स्पष्टीकरण देताना शाळा प्रशासनाने काय म्हटलं?
शाळा प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट करताना सांगितले की, आम्ही कोणताही फतवा काढलेला नाही. फक्त सूचना दिल्या आहेत. कडा, बांगड्या यामुळे इजा होऊ शकते. धार्मिक धागे किंवा टिळा यामुळे विद्यार्थ्यांत वाद होतात. म्हणूनच मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी त्याला मेमो देण्यात आल्याचेही प्रशासनाने सांगितले. मात्र पालक प्रशासनाच्या स्पष्टीकरणावर समाधानी नाहीत. समाधानकारक निर्णय न घेतल्यास आम्हीही रस्त्यावर उतरू, असा इशारा पालकांनी दिलाय.
ADVERTISEMENT
