पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरातून एका विवाहित महिलेच्या खूनप्रकरणाने खळबळ उडाली आहे. राणी विशाल गायकवाड (वय 30) या महिलेची तिच्याच विवाहित प्रियकराकडून गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयित अनिकेत महादेव कांबळे (रा. पिंपरी-चिंचवड) याला वाकड पोलिसांनी अटक केली असून तपासात अत्यंत थरारक माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, राणी गायकवाड आणि अनिकेत कांबळे हे दोघेही विवाहित असून त्यांना मुले आहेत. काही महिन्यांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. राणी हिच्या घरी या नात्याची माहिती मिळाल्यानंतर तिच्यावर घरच्यांनी दबाव आणायला सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर राणी सतत अनिकेतला सोबत राहण्याबाबत आणि लग्नाबाबत आग्रह करत होती. या दबावामुळेच अनिकेतने तिची हत्या करण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले.
अनिकेतने 27 नोव्हेंबर रोजी राणीला फोन करून फिरायला जाण्याचे सांगितले. कारने बाहेर पडले असताना दोघांमध्ये पुन्हा लग्न आणि सोबत राहण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. आधीच हत्या करण्याचा प्लान तयार करून ठेवलेल्या अनिकेतने कारचा मोर्चा धाराशिव जिल्ह्याकडे वळवला. कार ढोकी गावाजवळ पोहोचल्यावर राणी झोपलेली असताना अनिकेतने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर लोखंडी रॉडने तिच्या डोक्यावर वार करीत मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने त्या मृतदेहावर पेट्रोल ओतून आग लावली.
दरम्यान, 26 नोव्हेंबर रोजी राणी गायकवाड ही घरी निघून न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी वाकड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. पोलिसांनी रानीचा मोबाईल नंबर तपासला असता तिची शेवटचे लोकेशन आणि वारंवार झालेल्या कॉलची माहिती अनिकेतपर्यंत पोहोचली. यानंतर पोलिसांनी अनिकेतला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला पोलिसांना चुकीची दिशाभूल करणारा अनिकेत, तांत्रिक पुरावे दाखवल्यानंतर मात्र घडाघडा बोलू लागला आणि गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून विवाहित प्रेमसंबंधातून हत्या घडवून आणल्याने एक धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अनगर नगरपंचायतीची निवडणूक स्थगित; आता राजन पाटलांच्या सूनबाई बिनविरोध नगराध्यक्षा होणार का?
ADVERTISEMENT











