Pune Daund News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. त्यातच आज पुण्यातील दौंडमध्ये कचऱ्यात बरणीमध्ये 6 ते 7 मृत अर्भक आढळले. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
दौंडच्या बोरावके नगर परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये 6 ते 7 मृत अर्भकांचे अवशेष आढळून आले. त्यामुळेस्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. दौंड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
कशी उघडकीस आली घटना?
आज सकाळी ही घटना उघडकीस आली. काही स्थानिकांनी बोरावके नगर परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात संशयास्पद वस्तू पाहिल्या. नागरिकांना संशय आल्यावर त्यांनी जवळून पाहणी केली. त्यांना प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये मृत अर्भकांचे अवशेष दिसले. यात काही अर्भकांचे अवयवही आढळले अशी माहिती समोर आली आहे. ही माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ दौंड पोलीस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि वैद्यकीय विभागाला माहिती दिली.
दौंड पोलिसांकडून चौकशी सुरू
हे ही वाचा >> Kunal Kamra : कंगना-केतकीसोबत असंच घडलेलं तेव्हा पवार-ठाकरेंनी काय केलेलं?
दौंड पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हे मृत अर्भक कुणाचे आहेत, ते कचऱ्यात कसे आले आणि यामागील कारण काय आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी परिसरातील रुग्णालयं आणि दवाखान्यांची चौकशी सुरू केली आहे. या अर्भकांचे अवशेष वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्यांचे वय आणि मृत्यूचं नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.
दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा अवैध गर्भपात, अर्भकांची तस्करी किंवा वैद्यकीय कचऱ्याच्या चुकीच्या विल्हेवाटीचा मुद्दा चर्चेत आला आहे. तज्ञांच्या मते, अशा घटना घडण्यामागे अनेक कारणं असू शकतात. बेकायदेशीर गर्भपात असो किंवा रुग्णालयांकडून नियमांचं उल्लंघन झालं आहे का हे पाहावं लागणार आहे.
हे ही वाचा >> Samay Raina : इकडे कुणाल कामरा वादात, तिकडे समय रैनाने मागितली माफी, पोलिसांना दिलेल्या जबाबात काय म्हणाला?
महिला आयोगानं घेतली दखल
पुणे जिल्हा प्रशासन आणि राज्य महिला आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. "दौंड पोलिसांनी तपास सुरू केला असून, रुग्णालयांची चौकशीही सुरू आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होईल." असं महिला आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करून स्पष्ट केलं आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
सध्या हे प्रकरण संपूर्ण पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेलं आहे. हे अर्भक कोणाचे होते? त्यांचा मृत्यू कसा झाला? आणि त्यांना कचऱ्यात टाकण्यामागील उद्देश काय होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतरच मिळतील.
ADVERTISEMENT
