Pune Metro : पुण्यातील वाघोली परिसरातील एका आश्रमातील बाबाविरोधात गंभीर आरोप झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे. तक्रारदार महिलेने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, या प्रकरणाची सुरुवात सुमारे 2000 सालापासून झाली. महिलेचे आई-वडील हरियाणातील एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने संबंधित बाबांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर कुटुंबाची त्या बाबांवर श्रद्धा निर्माण झाली आणि त्यांचे आश्रमात नियमित येणे-जाणे सुरू झाले. तक्रारीनुसार, संबंधित बाबा राधामोहन मिश्रा यांनी कुटुंबाशी जवळीक वाढवत महिलेवर प्रभाव टाकण्यास सुरुवात केली. शिक्षणासाठी बाहेर गेलेल्या महिलेची आश्रमात वारंवार उपस्थिती राहावी यासाठी तिच्या वडिलांमार्फत संपर्क साधला जात असल्याचेही तिने म्हटले आहे. पुढे खाजगी भेटींच्या माध्यमातून तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रश्न विचारले जात होते तसेच तिच्यावर मानसिक दबाव टाकला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मातोश्रीचा निरोप, ठाकरेंचे 2 आमदार ओमराजेंच्या घरी, नेमकं काय घडलं?
दैवी शक्तीचा अवतार असल्याचे सांगून अत्याचार
तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, कालांतराने या वागणुकीचे स्वरूप अधिक गंभीर झाले. तिच्या इच्छेविरुद्ध मारहाण करण्यात आली, तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि स्वतःला दैवी शक्तीचा अवतार असल्याचे सांगून तिच्या मनात भीती निर्माण करण्यात आली. लग्नाबाबतची तिची इच्छा व्यक्त होताच संबंधित बाबांनी त्याला विरोध केला आणि तिच्या कुटुंबीयांनाही तिच्याविषयी नकारात्मक माहिती दिली. पुढे एका प्रसंगी पेय दिल्यानंतर स्वतःवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेनंतर वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचे तसेच धमक्या देण्यात आल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. आपल्या विरोधात कोणी विश्वास ठेवणार नाही, अशी भीती दाखवत आरोपीने दीर्घकाळ आपल्यावर नियंत्रण ठेवले, असा दावाही महिलेने केला आहे.
हेही वाचा : नर्तकीला बघताच तरुणांची नियत बिघडली, स्टेजवरून ओढत निर्जनस्थळी नेलं अन्..
वारंवार लैंगिक अत्याचार, मारहाण आणि मानसिक छळ
तक्रारीनुसार, पुढील काही वर्षांत महिलेचे कुटुंब पुण्यात स्थलांतरित झाले. त्या काळातही संबंधित व्यक्तीचा तिच्या आयुष्यावरील हस्तक्षेप कायम राहिला. पुण्यातील निवासस्थानी तसेच इतर ठिकाणी वारंवार लैंगिक अत्याचार, मारहाण आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप तिने केला आहे. स्वतःचे नग्न व्हिडीओ तयार करण्यात आल्याचा तसेच विविध प्रकारच्या अमानुष कृत्यांना सामोरे जावे लागल्याचा दावा तिने केला आहे. 2016 नंतर कुटुंबीयांना परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावर विश्वास ठेवला गेला नाही, असेही तिने म्हटले आहे. अखेर लग्न करून या सर्वातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र लग्नानंतरही आरोपीकडून संपर्क साधला जात होता आणि वैवाहिक आयुष्यावरही त्याचा परिणाम झाल्याचा आरोप तिने केला आहे. या संपूर्ण घटनाक्रमामुळे अखेरीस 2024 मध्ये घटस्फोट घ्यावा लागल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीनंतर पोलिसांनी वाघोलीतील आश्रमावर मोठी कारवाई केली. सुमारे 100 ते 200 पोलिसांच्या पथकाने आश्रम परिसरात छापा टाकून संबंधित बाबासह आठ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये सहा महिलांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन ही कारवाई केली. रिमांड अहवालानुसार, आरोपीकडून अमानुष, अंधश्रद्धाजन्य आणि अघोरी प्रथांबाबत तपास करायचा असून, इतर महिलांवरील संभाव्य अत्याचारांचाही तपास सुरू आहे. आश्रम परिसरातून रोख रक्कम, दागिने आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय काही औषधे आणि मोठ्या प्रमाणात कंडोम सापडल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगितले जात असले तरी त्याचा उल्लेख रिमांड अहवालात नसल्याने काही प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील न्यायालयीन सुनावणी आणि पोलिस तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT












