मातोश्रीचा निरोप, ठाकरेंचे 2 आमदार ओमराजेंच्या घरी, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Kailas Patil and Varun Sardesai Meets omraje nimbalkar : पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाच्या निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेण्यासाठी वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील पुण्यात पोहोचले. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली.

ADVERTISEMENT

Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkar
google news

बातम्या हायलाइट

point

मातोश्रीचा निरोप

point

ठाकरेंचे 2 आमदार ओमराजेंच्या घरी

point

नेमकं काय घडलं?

Kailas Patil and Varun Sardesai Meets omraje nimbalkar : पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणातील निकालानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू असतानाच पुण्यात त्यांच्या निवासस्थानी झालेल्या एका महत्त्वाच्या भेटीची चर्चा रंगली आहे. पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर ओमराजे निंबाळकर मुंबईहून कुटुंबासह पुण्यात परतले होते. दुसरीकडे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी आमदार कैलास पाटील आणि धाराशिवमधील शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यानंतर मध्यरात्री मातोश्रीवरून निघत आमदार वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील हे पुण्यात ओमराजे निंबाळकर यांच्या घरी पोहोचले. या तिन्ही नेत्यांमध्ये पुण्यात कोणती चर्चा झाली? जाणून घेऊयात... दरम्यान, पुण्यातल्या या भेटीनंतर ओमराजे हे धाराशिवकडे रवाना झाले  आहेत. 

ओमराजेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंनी दिली प्रतिक्रिया 

या भेटीनंतर माध्यमांनी चर्चा नेमकी कशाबाबत झाली, असा प्रश्न विचारला असता वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली. पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणातील निकालानंतर ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी आपण पक्षाच्या वतीने भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. अपेक्षित निकाल लागला नसल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाचा सचिव म्हणून मी तसेच आमदार कैलास पाटील यांच्यासह आपण त्यांची भेट घेतली आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सरदेसाई म्हणाले. मात्र त्या सर्व चर्चा माध्यमांसमोर मांडण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी नमूद केले.

ओमराजे निंबाळकर यांच्या मनधरणीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावरही वरुण सरदेसाई यांनी भूमिका स्पष्ट केली. ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेकडून आमदार झाले, त्यानंतर तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आणि आजही ते मशाल चिन्हावर निवडून आलेले धाराशिवचे खासदार असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात त्यांनी ज्या कारणासाठी प्रवेश केला आणि ज्यासाठी संघर्ष केला, त्या त्यांच्या वडिलांच्या हत्येच्या प्रकरणातील निकालानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठीच आपण गेलो होतो, असे त्यांनी म्हटले. ज्या विषयांवर चर्चा झाली ती सार्वजनिक करायची असती, तर भेटही उघडपणे झाली असती, असे सांगत त्यांनी अधिक तपशील देण्याचे टाळले.

कैलास पाटील नेमकं काय म्हणाले? 

दरम्यान, आमदार कैलास पाटील यांनीही या भेटीविषयी प्रतिक्रिया देताना पक्षप्रमुखांचा निरोप घेऊन आपण ओमराजे निंबाळकर यांच्याकडे गेलो होतो, असे सांगितले. गेली वीस वर्षे ज्या प्रकरणासाठी संघर्ष सुरू होता, त्या प्रकरणात न्याय मिळाला नसल्याची भावना त्यांच्या मनात असल्याचेही त्यांनी नमूद केले. ओमराजे निंबाळकर पक्षासोबत राहतील, असा विश्वास व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांची भावना कालही जशी होती तशीच आजही असल्याचे कैलास पाटील म्हणाले. भेटीत इतर कोणतेही मुद्दे नव्हते, आपण केवळ पक्षप्रमुखांचा निरोप घेऊन गेलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. निर्णयाबाबत विचारले असता, ओमराजे निंबाळकर यांनी एक दिवसाचा अवधी मागितल्याचेही कैलास पाटील यांनी सांगितले.

हे वाचलं का?