Ashok Kharat Case : भोंदूगिरी आणि अघोरी कृत्यांच्या माध्यमातून शेकडो निष्पाप लोकांना आपल्या जाळ्यात ओढणारा नराधम अशोक खरात याच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश झाल्यानंतर, आता त्याच्या गुन्हेगारीच्या पद्धतीबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. खरात केवळ बोलघेवडा नव्हता, तर त्याने भीतीचे एक असे मायाजाल विणले होते की सुशिक्षित लोकही त्याच्यासमोर नतमस्तक व्हायचे. त्याच्या या संपूर्ण साम्राज्य उभारण्यामागे बऱ्याच गोष्टी असल्या तरी अंधश्रद्धा पसवण्यासाठी आणि लोकांना भीती दाखवण्यासाठी त्याने दोन वस्तूंचा वापर केला. त्याच्या अघोरी कृत्यांचा आधार म्हणजे त्याने वापरलेल्या दोन विशिष्ट वस्तू होत्या. एक हुबेहूब दिसणारा 'नकली साप' आणि दुसरी वस्तू म्हणजे 'वाघाचे कातडे'. कोणत्याही सामान्य माणसाच्या मनात मृत्यूची भीती निर्माण करण्यासाठी या दोन गोष्टी पुरेशा होत्या. खरात याचा वापर करून लोकांना इतका घाबरवायचा की, समोरची व्यक्ती आपली विवेकबुद्धी गमावून त्याने सांगितलेल्या अघोरी कृत्यांना संमती द्यायची.
ADVERTISEMENT
या नराधमाने केवळ पैशांसाठीच नव्हे, तर आपल्या विकृत मानसिकतेतून अनेक महिलांचे आणि कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. अघोरी कृत्यांच्या नावाखाली त्याने चालवलेला हा गोरखधंदा केवळ अंधश्रद्धेवर आधारित नव्हता, तर तो अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या मानसिक दहशतीचा भाग होता. अशा भोंदू बाबांच्या भूलथापांना बळी न पडता, विज्ञानाची कास धरणे आणि कोणत्याही चमत्काराच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाविरुद्ध आवाज उठवणे हीच काळाची गरज बनली आहे.
अशोक खरातविरोधात आणखी एका पीडितेची तक्कार
भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. पीडित महिला गर्भवती असतांना नराधम खरातने लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आलाय. गरोदरपणात पूजा विधीच्या नावाखाली नराधम खरातने लैंगिक अत्याचार केल्याचं पीडितेने सांगितलंय. पीडिता आणि तिच्या कुंटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. नराधम खरात महिलेसोबत येणाऱ्या पतीला बाहेर बसवून लैंगिक शोषण करत होता. नराधम अशोक खरात विरोधात लैंगिक अत्याचार, महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अशोक खरातने जमवली 200 कोटींची माया
कॅप्टन खरातने गेल्या पाच वर्षांत अफाट संपत्ती जमा केल्याचे तपासात समोर येत आहे. अंकशास्त्र आणि भविष्याच्या नावाखाली त्याने केवळ राजकीय नेतेच नव्हे तर खाकी वर्दीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आपल्या प्रभावाखाली आणले होते. या प्रभावाचा वापर करून त्याने जवळपास 200 कोटी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. नाशिकमधील पाथर्डी परिसरात त्याची सुमारे 150 कोटी रुपये बाजारमूल्य असलेली 30 एकर जमीन असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. याशिवाय सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी आणि मीरगाव येथेही त्याची मोठी गुंतवणूक असून तिथे एक भव्य फार्महाऊस उभारण्यात आले आहे.
रुपाली चाकणकरांनी राजीनामा का दिला? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
अशोक खरातकडून महिलांवर करण्यात आलेल्या अत्याचार प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांना राजीनामा आवश्यक होता. रुपाली चाकणकर खरातला गुरु मानत होत्या. त्यामुळे या प्रकरणाचा व्यवस्थित तपास होण्यासाठी त्यांनी देखील पदमुक्त होण्याचं ठरवलं, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ADVERTISEMENT











