देवाला तरी घाबरा, बीडमध्ये चोरट्यांनी रात्रीतून जालिंदरनाथ मंदिरातील दानपेट्या उचलून नेल्या; पाहा व्हिडीओ

Beed Crime : मंदिर परिसरात अंधाराचा फायदा घेत तीन चोरटे शांतपणे आत शिरले. आधी परिसराची पाहणी करून त्यांनी दानपेट्या तोडल्या आणि काही सेकंदांतच संपूर्ण ऐवज घेऊन फरार झाले.

Beed Crime

Beed Crime

मुंबई तक

04 Dec 2025 (अपडेटेड: 04 Dec 2025, 12:40 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

देवाला तरी घाबरा, बीडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

point

रात्रीतून जालिंदरनाथ मंदिरातील दानपेट्या उचलून नेल्या; पाहा व्हिडीओ

Beed Crime : बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात पुन्हा एकदा मंदिरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. श्री क्षेत्र येवलवाडी येथील प्रसिद्ध जालिंदरनाथ देवस्थानात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करत दोन दानपेट्या उचलून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवस्थानातील दानपेट्यांवर हात साफ करणाऱ्या चोरट्यांचा संपूर्ण कारनामा येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री साधारण 1.30 वाजताच्या सुमारास घडली.

हे वाचलं का?

अधिकची माहिती अशी की, मंदिर परिसरात अंधाराचा फायदा घेत तीन चोरटे शांतपणे आत शिरले. आधी परिसराची पाहणी करून त्यांनी दानपेट्या तोडल्या आणि काही सेकंदांतच संपूर्ण ऐवज घेऊन फरार झाले. कॅमेऱ्यात दिसणाऱ्या फुटेजमध्ये तीनही चोरटे चेहऱ्यावर कपडा बांधून हलचाल करताना दिसत असल्याने त्यांची ओळख पटवणे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता वर्तवली जाते.

मंदिरात दीर्घकाळ भक्तांकडून जमा होत असलेली रक्कम, काही सोन्याचांदीची दागिने, तसेच पूजा साहित्य स्वरुपात मिळालेल्या वस्तू — मिळून दोन्ही पेट्यांमध्ये तब्बल 50 लाखांच्या आसपासचा ऐवज जमा असावा, असा प्राथमिक अंदाज देवस्थान समितीने व्यक्त केला आहे. त्यामुळे चोरीची रक्कम मोठ्या प्रमाणात असण्याची भीती अधिकच वाढली आहे.

हेही वाचा : मुंबई: पालकांनो सावधान! प्रतिष्ठित शाळेत अ‍ॅडमिशन देण्याच्या नावाखाली मोठी फसवणूक... ट्रॅफिक हवालदार निलंबित!

घटनेची माहिती सकाळी मंदिर उघडण्यासाठी आलेल्या पुजार्‍यांना मिळाली. त्यांनी तत्काळ गावकऱ्यांना बोलावले आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. व्हिडीओमध्ये चोरीचे संपूर्ण चित्रण दिसताच गावकऱ्यांनी तात्काळ पाटोदा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. दरम्यान, पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून पंचनामा आणि तपास सुरू केला आहे. परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज, संशयितांचा हालचालींचा मागोवा तसेच मोबाईल लोकेशन आदींच्या आधारे पोलिस तपासाची दिशा निश्चित करतील, अशी माहिती मिळते.

मंदिरावर वारंवार चोरीच्या घटना होत असल्याने स्थानिकांमध्ये संतापाची भावना असून, देवस्थानाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करून चोरी गेलेला ऐवज परत मिळवावा, अशी मागणी केली आहे. तसेच मंदिर व परिसरात सुरक्षेसाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.

या चोरीमुळे केवळ देवस्थानालाच नव्हे, तर संपूर्ण परिसरातील भक्तांचीही मन:शांती भंग झाली आहे. श्रद्धेच्या ठिकाणी अशी सततची चोरी होत असल्याने देवस्थान प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर अधिक काटेकोर दक्षता घेण्याची वेळ आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'तुझ्या मुलांपेक्षा जास्त सुंदर तर...', एका टोमण्याने पूनम बनली सायको किलर; चार निष्पाप चिमुरड्यांना पाण्याच्या टाकीत...

    follow whatsapp