Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा उलगडा पोलिस तपासातून झाला आहे. पोलीस दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा खून करून त्याचा मृतदेह घरालगतच्या पडक्या शेडमध्ये पुरण्यात आल्याचे समोर आले असून, हा खून कुण्या बाहेरच्याने नव्हे तर सख्ख्या लहान भावानेच केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
सख्ख्या भावानेच केला पोलीस कर्मचाऱ्याचा खून
शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बळ्हेगाव येथे ही घटना घडली. नानासाहेब दिवेकर (वय 48) असे खून झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाले होते. सध्या ते देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. पडेगाव येथून रोज ये-जा करत ते नोकरी सांभाळत होते. 1 जानेवारी रोजी नानासाहेब वडिलांची भेट घेण्यासाठी मूळ गावी बळ्हेगाव येथे आले होते. मात्र, दुपारी साडेदोन वाजल्यानंतर त्यांचा कुठलाही संपर्क झाला नाही. सायंकाळपर्यंत ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर शिऊर पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.
कोयत्याने वार करुन खून केला, अन् मृतदेह पडक्या घरात पुरला
मिसिंगच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्राथमिक चौकशीत काही संशयास्पद बाबी समोर आल्याने गोपनीय माहितीच्या आधारे तपास अधिक तीव्र करण्यात आला. या तपासात नानासाहेब यांचा लहान भाऊ लहानू रामजी दिवेकर (सातदिवे) याच्यावर संशय बळावला. चौकशीदरम्यान धक्कादायक सत्य उघडकीस आले. पोलिस तपासानुसार, 2 जानेवारीच्या रात्री कौटुंबिक वादातून लहानू भावानेच झोपेत असलेल्या नानासाहेब यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्यांचा निर्घृण खून केला. खून केल्यानंतर कुणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये खड्डा खोदून मृतदेह पुरून टाकला.
दरम्यान, नानासाहेब घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने गावात चौकशी केली. मात्र, कोणतीही ठोस माहिती न मिळाल्याने त्याने पोलिसांकडे धाव घेतली. या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब आणि किशोर अघाडे यांच्या पथकाने आरोपीपर्यंत पोहोचत गुन्ह्याचा उलगडा केला. रविवारी पोलिसांनी लहानू रामजी दिवेकर याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सोमवारी त्याला वैजापूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास शिऊर पोलीस करीत असून, कौटुंबिक वाद नेमका कशामुळे टोकाला गेला, याचा शोध घेतला जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











