Harshvardhan Kharat, नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास आता अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणाच्या चौकशीसाठी अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला ताब्यात घेतले होते. सलग 2 दिवस कसून चौकशी केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले होते. मात्र, चौकशीनंतर अवघ्या काही वेळातच हर्षवर्धनचा 'नॉट रिचेबल' असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचा मोबाईल फोन बंद असल्यामुळे आणि तो राहत्या घरीही सापडत नसल्याने तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
ADVERTISEMENT
तपास यंत्रणांना चकवा देऊन हर्षवर्धन बेपत्ता
हर्षवर्धन खरातचा मोबाईल फोन गेल्या काही काळापासून बंद असल्याने तपास पथकाने तातडीने त्याच्या निवासस्थानी जाऊन शोध घेतला, परंतु तो तिथे मिळून आला नाही. यामुळे एकच खळबळ उडाली असून तो जाणीवपूर्वक चौकशी टाळण्यासाठी गायब झाला आहे की यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खरं तर, प्रकरणाचा तपास सुरू असताना आणि चौकशी सुरू असताना संबंधित व्यक्तीने शहर सोडण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेणे अनिवार्य असते. मात्र, हर्षवर्धनने कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता किंवा यंत्रणेला पूर्वकल्पना न देता गायब होण्याचा मार्ग निवडल्याने संशय बळावला आहे.
कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन आणि एसआयटीचा गोंधळ
विशेष म्हणजे हर्षवर्धन खरात याच्यावर सध्या एकही गुन्हा दाखल नाही, तरीही तपासाच्या गरजेनुसार यंत्रणा त्याची वेळोवेळी चौकशी करत आहे. अशा परिस्थितीत त्याने तपास यंत्रणेला कोणतीही पूर्वसूचना न देता संपर्काबाहेर जाणे हे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तो सध्या नेमका कुठे आहे, त्याच्यासोबत कोणी आहे का, किंवा तपास यंत्रणेने त्याला दिलेल्या सूचनांचे त्याने उल्लंघन केले आहे का, याची सखोल माहिती आता SIT कडून घेतली जात आहे. हर्षवर्धन शहरात आहे की शहराबाहेर, याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या दिशांनी तपास चक्रे फिरवण्यात आली आहेत.
अशोक खरातच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून ती आधीच फरार आहे आणि पोलीस तिचा शोध घेत आहेत. आई फरार असतानाच आता मुलगाही 'नॉट रिचेबल' झाल्यामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे. खरात कुटुंबातील सदस्य एकापाठोपाठ एक गायब होत असल्याने तपासात अडथळे येत आहेत. आता हर्षवर्धन स्वतःहून समोर येतो की पोलिसांना त्याला शोधून काढावे लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नाशिक, शिर्डी आणि परिसरातील पोलीस यंत्रणेला सतर्क करण्यात आले असून शहरातील बाहेर जाणाऱ्या मार्गांवरही लक्ष ठेवले जात आहे, जेणेकरून या प्रकरणातील महत्त्वाच्या दुव्यांपर्यंत पोहोचता येईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Weather : राज्यात वारं फिरलं, 'या' जिल्ह्यांत अवकाळी पाऊस घालणार थैमान, हवामानाचा अलर्ट
ADVERTISEMENT











