मुंबई : घाटकोपर पश्चिम येथील केवीके या खासगी अनुदानित शाळेतील 20 विद्यार्थ्यांना शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना सोमवारी घडली. कॅन्टीनमध्ये तळण्यासाठी वापरल्या गेलेल्या तेलात चुकून कापूर पडल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. प्रकृती बिघडल्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने डॉक्टरांना बोलावून उपचार सुरू केले. दोन विद्यार्थ्यांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
ADVERTISEMENT
समोसे खाल्ल्यानंतर काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांना पोटदुखी अन् मळमळ
सकाळी कॅन्टीनमधील समोसे खाल्ल्यानंतर काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांना पोटदुखी, मळमळ जाणवू लागली. त्यातील सहा विद्यार्थ्यांना उलट्याही झाल्या. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच शाळेच्या प्राचार्या रिमा डिसूझा यांनी तत्काळ रमाबाई ठाकरे प्रसूतिगृहातील वैद्यकीय पथकाशी संपर्क साधला. डॉक्टर शाळेत दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. या संदर्भात पालकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. राजावाडी रुग्णालयात दाखल असलेल्या इकरा जाफर नियाज सय्यद (वय 11) आणि वैजा गुलाम हुसेन (10) यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. तर राजीव खान (11), आरुष खान (11) आणि अफजल शेख (11) यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
तेलात चुकून कापूर पडल्याची कबुली
कॅन्टीनमध्ये स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून अनवधानाने तळण्याच्या तेलात कापूर पडल्याची माहिती प्राचार्या रिमा डिसूझा यांनी दिली. त्याच तेलात तळलेले समोसे खाल्ल्याने विद्यार्थ्यांना त्रास झाला. शाळेने त्वरित पालिकेच्या डॉक्टरांना बोलावून आवश्यक उपचार केले, असे शिक्षण निरीक्षक मुश्ताक शेख यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून, तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, शाळांनी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्सचे नियम काटेकोरपणे पाळणे अत्यावश्यक असल्याचे एन विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र हंगे यांनी स्पष्ट केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











