पुणे: NCP चे आमदार म्हणतात, 'रस्ते आहेत तर अपघात होणारच...' प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारवरच चिडले

मुंबई तक

• 09:34 PM • 19 Aug 2026

पुण्यात खराब रस्त्यामुळे चिमुकल्याचा डंपरखाली येऊन मृत्यू झाला. यावर प्रश्न विचारताच NCP आमदार शंकर मांडेकर पत्रकारावर संतापले तसंच ‘रस्ते आहेत तर अपघात होणारच’ असं असंवेदनशील वक्तव्यही त्यांनी केलं.

ncp mla shankar mandekar roads accidents statement pune road death

NCP आमदार शंकर मांडेकर

Google CTA

पुणे: पुणे जिल्ह्यातील खराब रस्त्यामुळे एका चिमुकल्याचा डंपरखाली येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर संतापल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, रस्त्यांवर अपघात होण्याबाबत बोलताना त्यांनी ‘रस्ते आहेत तर अपघात होणारच’ अशा आशयाचे वक्तव्य केले.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

खराब आणि चिखलमय रस्त्यावरून वाहनांची वाहतूक सुरू असताना एका चिमुकल्याचा डंपरखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यांची दुरवस्था, जड वाहनांची वाहतूक आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

या घटनेत डंपर चालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. मात्र, केवळ वाहनचालकावर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही, तर खराब रस्त्यांसाठी जबाबदार असलेल्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवरही जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

‘लोकप्रतिनिधी काम करत नाहीत’ हा आरोप चुकीचा असल्याचा दावा

या प्रश्नावर बोलताना आमदार शंकर मांडेकर यांनी रस्त्याच्या समस्येची पार्श्वभूमी स्पष्ट केली. संबंधित रस्ता पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित होता आणि त्याच्या दुरुस्तीचे काम आपण केले असल्याचा दावा त्यांनी केला.

मात्र, पुढे पीएमआरडीए आणि टीपी स्कीमशी संबंधित प्रक्रियेमुळे रस्त्याची जबाबदारी आणि निधीबाबतचा प्रश्न निर्माण झाला. हा वाद गेल्या आठ-नऊ वर्षांपासून सुरू असल्याचे मांडेकर यांनी सांगितले.

त्यांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या कामासाठी निधी कोणत्या संस्थेने द्यायचा, हा प्रश्न अद्याप कायम आहे. दरम्यान, रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी आपण स्वतःच्या पातळीवर अनेकदा प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला.

‘मी स्वतः तीन कोटी रुपये खर्च केले’

रस्त्याच्या दुरुस्तीबाबत बोलताना मांडेकर यांनी या भागातील रस्त्यांसाठी आपल्या फंडाव्यतिरिक्त सुमारे तीन कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला. खड्डे बुजवण्याचे काम यापूर्वी दोन वेळा स्वतः करून घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच, घटनेनंतर संबंधित रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

जड वाहनांमुळे रस्त्याची अवस्था आणखी खराब?

या भागात मोठ्या टाऊनशिप आणि बांधकामांची कामे सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर डंपर, मिक्सर आणि इतर जड वाहनांची वाहतूक होत असल्याचे मांडेकर यांनी सांगितले.

पावसाळ्यात या वाहनांच्या टायरमधून चिखल रस्त्यावर येतो आणि त्यामुळे रस्ता आणखी धोकादायक बनतो, असा दावा त्यांनी केला. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत अशा जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याच्या सूचना आरटीओला दिल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रकाराच्या प्रश्नावर आमदार संतापले

मात्र, याच मुद्द्यावर पत्रकाराने मांडेकर यांना रस्त्याच्या दुरवस्थेसाठी प्रशासनाची जबाबदारी आहे का, असा थेट प्रश्न विचारला. त्यावेळी दोघांमध्ये प्रश्नोत्तरादरम्यान काही वेळ तीव्र शाब्दिक खडाजंगी झाली.

पत्रकाराने विचारले की, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होत असतील तर त्याची जबाबदारी कोण घेणार?

यावर मांडेकर यांनी रस्त्यामुळे अपघात होतात, असे कसे म्हणता, असा प्रतिप्रश्न केला. पुढे वाहन चालवताना अपघात होऊ शकतो आणि मोठ्या वाहनाच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी सांगितले.

याच चर्चेदरम्यान त्यांनी ‘रस्ते आहेत तर अपघात होणारच’ अशा आशयाचे वक्तव्य केल्याने त्यांच्या विधानावरून आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

पत्रकाराने मात्र संबंधित रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, लोकप्रतिनिधी सत्तेत असताना त्यावर कायमस्वरूपी उपाय का होत नाही, असा सवाल केला.

‘मी अधिवेशनात हा प्रश्न मांडला आहे’

मांडेकर यांनी आपली बाजू मांडताना हा प्रश्न आपण गेल्या दोन वर्षांपासून विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित करत असल्याचे सांगितले. संबंधित रस्त्यांसाठी निधीची मागणी केली असून, मात्र भूसंपादनाचा प्रश्न सुटत नसल्याने कामाला अडथळा येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या मते, अनेक रस्त्यांसाठी निधी मंजूर असला तरी जमीनमालकी आणि भूसंपादनाचा प्रश्न सुटलेला नाही. संबंधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालेला नसल्याने काही प्रकरणे न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मुख्यमंत्र्यांची भेट घेणार’

या घटनेनंतर रस्त्यांच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही मांडेकर यांनी सांगितले.

भूसंपादनाचा प्रश्न लवकर सोडवून रस्त्यांची कामे मार्गी लावावीत, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.