पंढरपूर : आढीव (ता. पंढरपूर) येथील एका 25 वर्षीय गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान चुकीच्या गटाचा रक्तपुरवठा झाल्यामुळे मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. आरती चव्हाण असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणानंतर शासनाने स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटरला तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT
प्रसूतीदरम्यान रक्तपुरवठा, पण 'क्रॉस मॅच'ची गंभीर चूक
आरती चव्हाण यांना प्रसूतीसाठी मोहिते हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना रक्ताची गरज भासल्याने नातेवाईकांनी स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटरमधून रक्त आणले. परंतु, रुग्णाला देण्यापूर्वी आवश्यक असलेली रक्तगट पडताळणी (क्रॉस मॅचिंग) सेंटरच्या टेक्निशियनकडून व्यवस्थित करण्यात आली नाही.
वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार, रुग्णाच्या रक्तगटाशी जुळणाऱ्या रक्तातील विसंगती तपासणे बंधनकारक असते. मात्र, ही प्रक्रिया न पाळल्याने रुग्णाचा ब्लड ग्रुप वेगळा असतानाही तिला ओ निगेटिव्ह रक्त देण्यात आले.
अन्न व औषध प्रशासनाची तात्काळ कारवाई
घटना समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने त्वरित चौकशी सुरू केली. सोलापूर येथील अधिकाऱ्यांनी मोहिते हॉस्पिटलचे डॉ. पवन कुमार मोहिते, त्यांचे सहकारी डॉक्टर व स्टाफ तसेच स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटरचे प्रमुख डॉ. गजानन बागल यांचे निवेदने नोंदवली. कशीत स्टोरेज सेंटरमधील एका कर्मचाऱ्याने आपली चूक कबूल केली असल्याचे समजते. इमर्जन्सी असल्याचे कारण देत त्याने केवळ सलाईन टेस्ट केली, परंतु प्रत्यक्ष रक्ताची विसंगती तपासणारी क्रॉस मॅचिंग प्रक्रिया न केल्याचे त्याने मान्य केले.
रुग्णाची प्रकृती बिघडली, अखेर मृत्यू
2 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरती चव्हाण यांना हे चुकीचे रक्त दिले गेले. काही तासांतच प्रसूतीवेदना वाढताना तिच्या मूत्रविसर्जनावाटे रक्तस्राव सुरू झाला. गंभीर स्थिती लक्षात आल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया थांबवून तिला अत्यवस्थ अवस्थेत सोलापूर येथे हलवण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. सोलापूर येथे उपचार सुरू असतानाही तिची प्रकृती सुधारली नाही आणि दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला.
ब्लड स्टोरेज सेंटरचा परवाना रद्द
तपासणी अहवाल पुणे विभागीय आयुक्त जी. डी. हुकरे यांना पाठवण्यात आला. अहवालातील गंभीर त्रुटींवर कारवाई करत त्यांनी स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटरचे कामकाज पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश जारी केले. आयुक्तांनी आदेशात नमूद केले की, रुग्णाला दिले जाणारे रक्त योग्य रितीने मॅच केले गेले नसल्याचे स्पष्टपणे दिसते आणि हा प्रकार रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे. त्यामुळे केंद्राचे कामकाज तातडीने थांबविण्यात आले आहे. या घटनेने पंढरपूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका तरुण जीवाचा बळी गेला आहे. रुग्णांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या अशा केंद्रांवर कठोर कारवाई होण्याची मागणी होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











