Raigad Crime, नेरळ : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीअंतर्गत कुरकुलवाडी वस्तीत किरकोळ भांडणाच्या रागातून शेजारणीने अडीच वर्षांच्या बालकाचा गळा दाबून जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरलाय. शेजाऱ्याची मुले माझ्या मुलांना मारतात म्हणून रागाच्या भरात हे पाऊल उचलल्याची कबुली आरोपी जयवंता गुरुनाथ मुकणे हिने पोलिसांसमोर दिली आहे. या प्रकरणात मृत चिमुकल्याचे नाव जयदीप गणेश वाघ असे असून, त्याच्या अचानक मृत्यूला सुरुवातीला नैसर्गिक कारणांचा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र नेरळ पोलिसांनी तपासाची सूत्रे हातात घेतल्यानंतर हा खून असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी जयवंताला अटक करण्यात आली असून, तिला 17 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
ADVERTISEMENT
नैसर्गिक मृत्यू झाल्याचं सर्वांना सांगितलं, पण अखेर सत्य समोर आलं
घटनेदिवशी म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी जयदीपचे आई-वडील गणेश वाघ आणि त्यांची पत्नी पुष्पा मजुरीसाठी बाहेर गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत जयदीप आणि त्याची भावंडे घरासमोर खेळत होती. त्याच वेळी शेजारी राहणारी जयवंता मुकणे हिने जयदीपला उचलून घराच्या मागील पायवाटेकडे नेले. संतापाच्या भरात तिने चिमुकल्याचा गळा आवळून त्याला ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्हा लपवण्यासाठी मुलगा अचानक बेशुद्ध पडल्याचा आणि नैसर्गिक मृत्यू झाल्याचा खोटा प्रसंग तिने उभा केला. मुलाला तातडीने कळंब रुग्णालयात नेले गेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. परिस्थितीवर विश्वास ठेवून कुटुंबाने परंपरेनुसार अंत्यसंस्कारही पूर्ण केले.
हेही वाचा : धुळे : पेढ्यातून गुंगीचे औषध दिलं, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करतो म्हणत 60 लाख उकळले
पोस्टमॉर्टेमसाठी पुरलेला मृतदेह बाहेर काढला
परंतु एका नागरिकाच्या गुप्त माहितीमुळे पोलिसांच्या हातात महत्त्वाचा धागा लागला. नेरळ पोलिस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव यांच्या परवानगीने पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनात मुलाचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले व पोलिसांचा संशय बळावला. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबरला जयवंता मुकणे हिने मृत मुलाच्या चार वर्षांच्या बहिणीलाही गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्या दिवशी परिस्थिती बिघडली आणि प्रयत्न असफल ठरला. दुसऱ्याच दिवशी तिने एकट्या पडलेल्या जयदीपवर हल्ला करून त्याचा जीव घेतला.
पोलिसांनी तपासातून पुरावे गोळा करताच आरोपी महिलेला गुन्ह्याची कबुली द्यावी लागली. विशेष म्हणजे, जयवंतालाही तीन मुले आहेत. दीड वर्षांची जुळी मुले आणि एक मोठा मुलगा जो बहिणीला दत्तक दिला आहे. परंतु शेजारी मुलांमध्ये झालेल्या साध्या वादातून इतक्या निर्दयी प्रकाराला तिने हात घातल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. नेरळ पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, या घृणास्पद कृत्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











