इस्लामपूर, सांगली : इस्लामपूर शहरातील अंबाबाई मंदिर परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय नवविवाहित अमृता ऋषीकेश गुरव हिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासूच्या उपचारासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी वारंवार तगादा लावल्यामुळे अमृताने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
सासरकडील मंडळींकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ
फिर्यादी वंदना अनिल कोले (रा. रेठरेहरणाक्ष) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमृताचा सासरकडील मंडळींकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. सासू कर्करोगाने त्रस्त असल्याने तिच्या उपचारासाठी दोन लाख रुपये माहेरहून आणावेत, असा दबाव अमृतावर टाकण्यात येत होता. या सततच्या जाचहाटीला कंटाळून तिने आत्महत्येचा मार्ग पत्करला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
हेही वाचा : भरधाव Ertiga कार डिव्हायडर तोडत समुद्रात कोसळली अन् थेट तळाला; मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात
अमृताचा सुमारे अकरा महिन्यांपूर्वी ऋषीकेश गुरव याच्याशी प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला संसार सुरळीत असला, तरी नंतर सासरकडून पैशासाठी त्रास सुरू झाला, अशी माहिती अमृताच्या नातेवाईकांनी दिली.
या प्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात पती ऋषीकेश अनिल गुरव, सासू अनुपमा अनिल गुरव, सासरे अनिल मधुकर गुरव, नणंद ऋतुजा अनिल गुरव (सर्व रा. इस्लामपूर) आणि पतीचा मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव (रा. वडणगे, जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०६, ४९८ (अ) आणि हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पुण्यातील वैष्णवी हगवणे या नवविवाहित मुलीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. विशेष म्हणजे वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी तिला हुंड्यात फॉर्च्युनर कार देखील गिफ्ट म्हणून दिली होती. तरी देखील गुंडप्रवृतीच्या लोकांनी तिचा अतोनात छळ केल्याचं समोर आलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
