सातारा जिल्ह्यात धुवाधार पाऊस, दोन दिवस रेड अलर्ट; आंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद

इम्तियाज मुजावर

• 11:06 AM • 04 Jul 2026

सातारा जिल्ह्यात पावसाने रौद्ररुप धारण केले आहे. महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. अशातच दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आंबेनळी घाट बंद करण्यात आला आहे.

Satara Rain Update

Satara Rain Update

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सातारा जिल्ह्यात धुवाधार पाऊस

point

दोन दिवस रेड अलर्ट

point

आंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद

Satara Rain Update : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले असून महाबळेश्वर, जावळी, वाई, पाटण आणि सातारा तालुक्यांमध्ये दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या भागात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असून सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वरमध्ये झाली आहे. महाबळेश्वर येथे अवघ्या 24 तासांत तब्बल 186.8 मिलीमीटर, म्हणजेच साडेसात इंचांहून अधिक पाऊस पडल्याने ठिकठिकाणी पाणी साचले आहे. पावसाचा हाच जोर कायम राहिल्यास प्रसिद्ध वेण्णा तलाव ओव्हरफ्लो होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, प्रशासनाने पश्चिम साताऱ्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

हे वाचलं का?

वाहतूक व्यवस्थेला फटका

या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला असून अनेक घाटरस्त्यांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. महाबळेश्वर-वाई मार्गावरील पसरणी घाटात आणि पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात अचानक दरडी कोसळल्या. खंबाटकी घाटात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर मलबा आल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून काही काळ एक लेन बंद ठेवावी लागली होती, तर पसरणी घाटातही वाहतुकीचा वेग मंदावला होता. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पाठवून मलबा हटवला आणि रस्ता मोकळा करून वाहतूक पूर्ववत केली. याशिवाय, महाबळेश्वर तालुक्यातील मांघर गावाजवळ मुसळधार पावसामुळे नव्याने बांधण्यात आलेली एक संरक्षक भिंतही कोसळली, परंतु सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हे ही वाचा : वाशिम : 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा, न्यायालयाचा मोठा निर्णय; नेमकं प्रकरण काय?

रेड अलर्ट

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे डोंगरकड्यांवरून दरडी कोसळण्याचा धोका प्रचंड वाढला असून हवामान विभागाने सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा भागासाठी पुढील दोन दिवस 'रेड अलर्ट' जारी केला आहे. अतिवृष्टी, भूस्खलन आणि संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय प्रवास टाळावा, विशेषतः घाटरस्त्यांवरून प्रवास करताना चालकांनी कमालीची सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी केवळ अधिकृत सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीचे व प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हे ही वाचा : केतन अग्रवाल हत्या प्रकरण : नवीन सेलफोन, सांकेतिक भाषा; कोर्टात सुनावणी कशी फिरली?

आंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद

घाटांमधील वाढता धोका पाहता रायगड जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाचा खबरदारीचा उपाय म्हणून महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणारा मुख्य आंबेनळी घाट 3 जुलै ते 7 जुलै या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहनचालकांनी प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या सातारा आणि शेजारील जिल्ह्यांची आपत्कालीन यंत्रणा संपूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली असून, कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन परिस्थितीवर 24 तास लक्ष ठेवून आहे.