रोहिदास हातागळे, बीड: साडी मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून एका महिलेने आपल्याच मैत्रिणीच्या घरातील लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
फिर्यादी वनदेव भास्कर सुळे (वय 31, रा. जवाहर कॉलनी, बीड) हे पेशाने वकील आहेत. त्यांची पत्नी सपना यांची मैत्रीण दिया नानासाहेब मते (रा. गंगावाडी, ता. गेवराई) ही 17 एप्रिल रोजी दुपारी लग्नासाठी साडी मागण्याच्या बहाण्याने सुळे यांच्या घरी आली होती. त्यानंतर तिने वारंवार सुळे यांच्या घरी येणे-जाणे सुरू ठेवले. या दरम्यान सपना घरात कामात व्यस्त असल्याचे पाहून दियाने कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि पर्समधील रोकड चोरून नेली. 15 मे रोजी घरातील दागिने बेपत्ता असल्याचे सपना यांच्या निदर्शनास आले.
आरोपी दियाने नेमकी काय दिली पोलिसांसमोर कबुली?
या चोरीबाबत सुळे यांनी पोलिसांत तक्रार अर्ज दिला होता. महिला पोलीस अंमलदार राठोड यांनी संशयित दिया मते हिला चौकशीसाठी बोलावले असता, तिने उपस्थित पोलीस अधिकारी व फिर्यादी यांच्यासमोर चोरी केल्याची कबुली दिली.
हे ही वाचा>> दुधातील भेसळ कशी ओळखाल? काय पाहायचं? तुकाराम मुंढेंचा महत्त्वाचा सल्ला
चोरलेले दागिने शहरातील डी. के. ज्वेलर्स आणि दिपाली ज्वेलर्स येथे मोडल्याचे तिने सांगितले. दियाने 5 जुलैपर्यंत दागिने परत आणून देण्याचे कबूल केले होते, मात्र, तिने दागिने न दिल्याने अखेर हा गुन्हा नोंदवण्यात आला.
या चोरीत 66 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, 96 हजार रुपयांचे मिनी गंठण, 7 हजार 500 रुपयांची सोन्याची नथ, 6 हजार रुपयांची सोन्याची अंगठी, 33 हजार 750 रुपयांचे चांदीचे दागिने आणि 25 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 2 लाख 34 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
हे ही वाचा>> मुंबईची खबर : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत किती पाणी? पाणीकपात थांबणार का?
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बालाजी सुरेवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












