विशाल ठाकूर, धुळे: धुळे तालुक्यातील अजनाळे गावामध्ये सोमवारी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी आक्रमक झालेल्या काही नागरिकांकडून थेट पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करत कर्मचाऱ्यांना जखमी करण्यात आलं होतं. दुसरीकडे नागरिकांनी आरोप केला की पोलिसांकडून घरामध्ये घुसत संसार उपयोगी साहित्याची तोडफोड करण्यात आली. नेमकं काय घडलं अजनाळे गावामध्ये सविस्तर जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
नेमकं घडलं तरी काय?
धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अजनाळे गावामध्ये पोलीस पथकाने काही आरोपींना पकडण्यासाठी व चौकशीसाठी रविवारी सापळा लावला होता. यावेळी काही संशयास्पद तरुणांची पोलिसांकडून चौकशी केली जात होती. मात्र, याचदरम्यान काही समज-गैरसमजातून आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांनी पोलिसांना अरेरावी करत त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. त्यावेळी या स्थानिकांकडून पोलीस वाहनांची तोडफोड ही करण्यात आली. यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी देखील झाले.
हे ही वाचा>> आधी सोशल मीडियावर ओळख अन् नंतर वृद्धाला हॉटेलमध्ये बोलवून शारीरिक संबंध... 'अशा' पद्धतीने केलं ब्लॅकमेल!
दरम्यान पोलिसांनी यावेळी सर्रासपणे नागरिकांच्या घरामध्ये घुसून संसार उपयोगी साहित्याची तोडफोड केली असल्याचा आरोप करत पोलीस नेहमीच अशा प्रकारची अरेरावी या ठिकाणी करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे पोलिसांनी संशयास्पद तरुणांना शोधण्यासाठी कोंम्बिग ऑपरेशन राबवलं असल्याचं सांगत पोलिसांकडून कोणत्याही प्रकारे नासधूस केली नसून विचारपूस करत असताना नागरिकांनी दगडफेक केली आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा>> हनीमूनच्या दिवशी नवऱ्याने बेडरूममध्ये लावला हिडन कॅमेरा, प्रायव्हेट व्हिडीओ बनवून दुबईच्या मित्रांना पाठवला अन्...
त्यामुळे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
येथील लोकांवर नेमके कोणते आरोप?
दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणची काही लोक दुतोंडी साप, काळी हळद, पांढरा भिलावा, नागमणी यांच्यासह पैसे डबल करून देण्याचं आमिष दाखवत अंधश्रद्धा पसरवण्या बरोबरच फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती.
तर याआधी देखील गावातील अनेक जणांवर दरोडा, फसवणूक यांसारखे गुन्हे दाखल असल्याचे देखील सांगण्यात आल आहे. दरम्यान, सद्यस्थितीत या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
ADVERTISEMENT
