Beed Crime News, रोहिदास हातागळे : बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सायगाव येथे लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच एका 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सानिया साजेद शेख असे मृत विवाहितेचे नाव आहे. सतत पैशांची मागणी करत तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
'माहेरहून 50 हजार आण'
या प्रकरणी मृत सानियाचे वडील अब्दुल पाशामियाँ शेख (वय 42, लातूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांनी आपली मुलगी सानिया हिचे लग्न 25 मे 2025 रोजी सायगाव येथील साजेद हमेद शेख याच्याशी करून दिले होते. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच लोकांचे देणे देण्यासाठी माहेरहून 50 हजार रुपये आणण्याची मागणी सासरच्या मंडळींनी सानियाकडे लावून धरली होती. फिर्यादीची आर्थिक परिस्थिती गरिबीची असतानाही त्यांनी मुलीच्या सुखासाठी 50 हजार रुपये आणून दिले होते.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यावर अस्मानी संकट, जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
पुन्हा पैशांची मागणी
मात्र, एवढ्यावरच न थांबता सासरच्या लोकांकडून पुन्हा पैशांची मागणी केली जाऊ लागली. यासाठी सानियाला सतत शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात होता. अखेर सासरच्या या असह्य जाचाला कंटाळून 5 जून ते 6 जून 2026 च्या दरम्यान सानियाने सायगाव येथील राहत्या घरी लोखंडी पाईपला मफलरने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. तिच्या आकस्मिक निधनाने माहेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हे ही वाचा : Personal Finance: पगारदारांनी घर खरेदीनंतर इंटिरिअरवर ‘एवढाच’ करावा खर्च, नाहीतर वाढेल टेन्शन!
नवऱ्यासह पाच जण ताब्यात
या आत्महत्येप्रकरणी मृत सानियाचा पती साजेद हमेद शेख, सासरा हमेद हमजामियाँ शेख, दीर वाजेद हमेद शेख, सासू जबिन हमेद शेख (सर्व रा. सायगाव, ता. अंबाजोगाई) आणि नणंद शेख आयशा फिरोज मिर्झा (रा. लातूर) यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारहाण व हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील पाच आरोपींपैकी पोलिसांनी तिघांना अटक केली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत. अटक केलेल्या तीन आरोपींना अंबाजोगाई न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT












