Beed Crime : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात ऐन दिवाळीत एक धक्कादायक घटना घडली आहे. अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. ही घटना हत्या आहे की आत्महत्या? याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण (वय अंदाजे 28) असे मृत तरुणाचे नाव आहे.
ADVERTISEMENT
रस्त्यावरुन जात असताना लोकांना दिसला मृतदेह
अधिकची माहिती अशी की, शनिवारी सकाळी अंभोरा-हिवरा रस्त्यालगतच्या कच्च्या रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांच्या नजरेस एका तरुणाचा मृतदेह पडलेला दिसला. घटनेची माहिती त्यांनी तात्काळ अंभोरा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता, मृतदेहाजवळ एक पिस्तूल पडलेले आढळले. तपासादरम्यान मयूरच्या छातीत गोळी लागल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा : गरोदर महिला तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेली, पण अल्ट्रासाउंड करताना डॉक्टरचे अश्लील कृत्य... प्रकरण थेट पोलिसात
या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मयूर चव्हाण हा मिस्त्री म्हणून काम करत होता. त्याच्याकडे पिस्तूल आले कुठून? त्याच्यावर कोणी गोळी झाडली का, की त्याने स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केली, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी पिस्तूल जप्त करून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोस्टमॉर्टेम आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
अंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या घटनेचा तपास करत आहेत. मयूरच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू असून, त्याच्या मित्रमंडळींनाही पोलिसांनी विचारपूस केली आहे. दरम्यान, मयूरने काही वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केली असावी, अशी चर्चा गावात सुरू असली तरी पोलिसांनी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही.
दिवाळीच्या सणाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदाच्या वातावरणात तरुणाच्या अचानक झालेल्या या मृत्यूमुळे अंभोरा आणि परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. पोलिसांकडून घटनास्थळावरील सर्व पुरावे तपासले जात असून, सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
