Ganpat Gaikwad: BJP आमदाराचा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, ‘तो’ वाद काय? Inside Story

मुंबई तक

• 02:13 PM • 03 Feb 2024

Ganpat Gaikwad Inside Story: भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यातील वादाची नेमकी इनसाईड स्टोरी काय ते आपण जाणून घेऊया.

bjp mla ganpat gaikwad firing in police station what exactly is the land ownership dispute with shiv sena leader mahesh gaikwad inside story

bjp mla ganpat gaikwad firing in police station what exactly is the land ownership dispute with shiv sena leader mahesh gaikwad inside story

follow google news

Ganpat Gaikwad firing inside Story: निलेश झालटे, उल्हासनगर: उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच भाजपा (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. कल्याण, ठाण्यात भाजप आणि शिंदे गटात वाद तसा नवा नाही. मात्र पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भाजप आमदारानं चक्क गोळीबार केल्यानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. (bjp mla ganpat gaikwad firing in police station what exactly is the land ownership dispute with shiv sena leader mahesh gaikwad inside story)

हे वाचलं का?

आता यावर सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत, शिवाय खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणात सखोल चौकशी करुन कारवाईबाबत आश्वासन दिलंय. महेश गायकवाड हे व्हेंटिलेटरवर आहेत तर राहुल पाटीलवर आयसीयूमध्ये सध्या उपचार सुरू आहेत तर आमदार महोदय जेलमध्ये पोहोचले आहेत. हे सगळं प्रकरण सुरु झालं ते एका जमिनीच्या वादातून. जमिनीच्या वादातून सुरु झालेलं हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गोळीबारापर्यंत कसं पोहोचलं यामागची इनसाईड स्टोरी आपण जाणून घेऊयात.

तो वाद नेमका काय?

आधी गोळीबार कसा झाला त्याबाबत जाणून घेऊ… या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यात दिसतंय की, वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात महेश गायकवाड यांच्यासह पाच लोक समोर बसले होते. तिथं आमदार गणपत गायकवाड देखील होते. त्यांच्यात काही चर्चा होत असल्याचं दिसत होतं. अचानक काही वेळाने आमदार गणपत गायकवाड उठतात आणि बेछूट गोळीबार सुरु करतात. आणि धावपळ सुरु होते.

सगळेजण जीव वाचवण्यासाठी पळत सुटतात. गोळ्या संपेपर्यंत गणपत गायकवाड हे गोळीबार करत राहतात, त्यानंतर ते रिकाम्या झालेल्या बंदुकीने देखील महेश गायकवाड यांना मारहाण करतात, असं सीसीटीव्हीत दिसतंय.

हे ही वाचा>> Exclusive: ‘ही’ दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात, BJP आमदाराचा गोळीबार CCTV मध्ये कैद

पोलिसांनी याबाबत सांगितलं की, दहा राऊंड फायर करण्यात आले आहेत. एका बंदुकीतून सहा तर दुसऱ्या बंदुकीतून चार राऊंड फायर झालेत. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे दोघेही तक्रार देण्यासाठी आले होते. दोघांमध्ये काही चर्चा सुरु होती. त्यावेळी बाहेर जमाव आल्याने पीआय बाहेर समजावण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान अचानक आमदार गणपत गायकवाड यांनी निशाणा धरुन जीवे मारण्याच्या हेतूने गोळीबार केला.

‘आपल्याकडे सीसीटीव्हीचे भक्कम पुरावे आहेत. गणपत गायकवाड यांनी उठून शांत बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या दिशेने त्यांच्यावर नेम रोखून गोळीबार केला.’ असं पोलिसांनी सांगितलं. हा गोळीबार आत्मसंरक्षाणासाठी अजिबात झालेलं नाही. सीसीटीव्हीत हे स्पष्ट दिसतंय, महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी शांतपणे बसले होते. यावेळी गाफील असलेल्या महेश गायकवाड त्यांच्यावर गणपत गायकवाडांनी अचानक गोळीबार केला.

दुसरीकडे.. ‘होय, मी गोळीबार केला..’ असं खुद्द गणपत गायकवाडांनी देखील सांगितलं आहे. पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केल्याचं गणपत गायकवाड यांनी कबूल केलं.

‘माझ्या मुलांना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण होत होती. त्यामुळे माझ्यासमोर पर्याय नव्हता. पोलिसांसमोर माझ्यावर जर कुणी हल्ला करत असेल तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी असं करणं गरजेचं होतं.’ असे गणपत गायकवाड यांनी सांगितले.

आता त्या जमिनीचे प्रकरण काय आहे ते आपण बघूया…

हिललाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील द्वारली गावात एक जमीन आहे. या 50 गुंठे जमिनीचे मालक एकनाथ जाधव आणि कुटुंबीय आहेत. एकनाथ जाधव आणि कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू होते. त्यांच्यात बोलणीही सुरू होती. याचदरम्यान कंपाऊंड टाकण्यावरुन वाद झाला.

याबाबत एकनाथ जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, ‘कंस्ट्रक्शन कंपनीशी संबधित व्यक्ती आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे संबंध आहेत. 1996 पासून आमच्या जमिनीचे पूर्ण पैसे देण्यात आलेले नाही. याआधी सात-बारावर आमची नावं होती. मात्र, मागील आठवड्यात सात-बारावरावर रांकाचं नाव टाकण्यात आलं. तसंच आम्हाला योग्य मोबदला मिळाला नाही. त्यामुळे आम्ही महेश गायकवाड यांची भेट घेतली.’

‘महेश दादा आम्हाला म्हणाले की, मी तुम्हाला न्याय मिळवून देतो. पण आता गणपत गायकवाडांनी त्यांच्यावरच गोळ्या झाडल्या.. त्यांच्यासारख्या नेत्यावर गोळ्या झाडतात तर आम्हाला काय हे लोकं सोडतील का? त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावं.’ अशी प्रतिक्रिया जमिनीचे मालक एकनाथ जाधव यांनी दिली आहे.

हे ही वाचा>> Ganpat Gaikwad : 4 गोळ्या काढल्या, शिवसेनेच्या महेश गायकवाडांची मृत्यूशी झुंज सूरू

याच वादातून तक्रार देण्यासाठी गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे दोघेही पोलीस स्टेशनमध्ये आले होते. जिथे गणपत गायकवाड यांनी बेछूट गोळीबार केला.

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण कल्याण-डोंबिवली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेची स्थितीही लक्षणीयरीत्या बिघडू शकते. यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला कठोर पावलं उचलावी लागण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून कल्याण लोकसभा मतदार संघात धुसफूस सुरूच आहे. या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे हे भाजप आमदारांना काम करू देत नसल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. दुसरीकडे भाजपकडून देखील श्रीकांत शिंदेंना वारंवार टार्गेट करण्यात येत आहे. गणपत गायकवाडांनी याआधीही एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधला होता. शिवाय त्यांनी गोळीबारानंतरही त्यांनी शिंदेंवरच आरोप केले आहेत. अशा परिस्थितीत या गोळीबाराच्या घटनेने भाजप आणि शिवसेना यांच्यात निश्चितच ठिणगी पडली आहे.

    follow whatsapp