सातारा: आंबेनळी घाट परिसरात पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत बावलीटोका खाली व चिरेखिंडच्या वरती असलेल्या मुख्य रस्त्यालगत एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह मोरीत कोंबून ठेवलेला आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अत्यंत संशयास्पद आणि धक्कादायक स्वरूपाच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ही हत्या असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
आज सकाळी आंबेनळी घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परिसरात तीव्र दुर्गंधी जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी रस्त्यालगत असलेल्या मोरीत डोकावून पाहिले असता त्यांना एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलादपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
हे ही वाचा>> शाळेत जाताना आठवीच्या विद्यार्थिनीचा बलात्कार करुन खून, प्रशासनानं कुटुंबियांना दिलं नोकरीचं आश्वासन; नेमकं काय घडलं?
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून तपासासाठी फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळी दाखल झाली आहे. प्राथमिक तपासात मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट होत असून, हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मोरीत टाकण्यात आल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिचे वय अंदाजे 30 ते 40 वर्षांदरम्यान असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा>> 10 वीचा गणिताचा पेपर सुरु असताना प्रसुती वेदना, विद्यार्थीनीने बाथरुममध्ये दिला बाळाला जन्म, माहिती मिळताच कान्हा फरार
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, मागील काही दिवसांत बेपत्ता झालेल्या महिलांच्या तक्रारींचा आढावा घेतला जात आहे. तसेच मोबाइल लोकेशन, स्थानिक माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कसून तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असून त्यातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आंबेनळी घाट हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मार्ग असल्याने या घटनेमुळे पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी तसेच या घटनेचा लवकरात लवकर छडा लावावा, अशी जोरदार मागणी केली आहे. पोलादपूर पोलीस ठाण्याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास युद्धपातळीवर सुरू असून लवकरच आरोपींचा शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT











