Crime News: ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथील खेत्रराजपूर परिसरातील लक्ष्मीडुंगुरी टेकडीवर एका तरुणाचा मृतदेह आढळला. या प्रकरणासंबंधी पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, लव्ह ट्रँगल म्हणजेच प्रेमसंबंधातून ही हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी घटनेतील मुख्य आरोपी आशुतोषला अटक केली असून संबंधित अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. हत्येच्या वेळी उपस्थित असलेला तिसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
प्रियकाराचा काटा काढण्याचा कट रचला अन्...
प्रकरणातील मृत तरुणाचं नाव अभय दास असून त्याचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचं तपासादरम्यान समोर आलं. काही काळानंतर, संबंधित तरुणीची आशुतोष नावाच्या तरुणाशी ओळख झाली आणि त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. याच कारणामुळे, अभयचे तिच्या प्रेयसीसोबत सतत वाद व्हायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष आणि त्या तरुणीने मिळून अभयचा काटा काढण्याचं ठरवलं, जेणेकरून त्यांच्यातील नातेसंबंध पुढे सुरू राहील.
चाकू आणि सर्जिकल ब्लेडने वार करून हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीने आशुतोषसोबत मिळून अभयच्या हत्येचा कट रचला आणि त्याला एका टेकडीवर बोलवलं. तिथे, आरोपींनी अभयला नशेचा पदार्थ मिसळून एक कोल्डड्रिंक प्यायला दिलं. त्यानंतर, अभय बेशुद्ध झाला आणि आरोपीने पीडित तरुणावर चाकू तसेच सर्जिकल ब्लेडने वार करून हत्या केली. हत्येनंतर, आरोपींनी त्याचा मृतदेह एका दरीत फेकून दिला आणि दोघे घटनास्थळावरून फरार झाले.
हे ही वाचा: मुंबई: शारीरिक संबंधासाठी अल्पवयीन मुलीला पैसे देणं, तिचा हात पकडणं हा देखील POCSO गुन्हा... हायकोर्टाचं निरीक्षण
कुटुंबियांनी घेतला शोध
पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रामानंद दास यांनी 8 डिसेंबर रोजी त्यांचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो सापडला नाही. घरी परतताना त्यांना त्यांच्या मुलाची स्कूटर रस्त्यावर दिसली. त्यांना वाटलं की तो रस्त्याच्या कडेला स्कूटर सोडून पेट्रोल भरण्यासाठी गेला असावा. म्हणून त्यांनी आजूबाजूच्या परिसरात खूप शोध घेतला पण तो सापडला नाही. 100 मीटर चालल्यानंतर तक्रारदाराला त्याच्या मुलाची चप्पल सापडली. त्यानंतर, तेथील जवळच्या डोंगराळ भागात गेल्यावर त्याला त्याच्या मुलाचा मृतदेह आढळला. मृताच्या छातीवर, हातावर, मानेवर आणि डोक्यावर चाकूने वार केल्याच्या जखमा होत्या. अखेर, मुलाची हत्या करण्यात आल्याचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला.
हे ही वाचा: क्राइम पेट्रोल बघून पळून जाण्याचा प्लॅन... 24 दिवसांनंतर दोघी पंजाबमध्ये सापडल्या, तरुणींच्या 'या' कृत्यामागचं कारण काय?
तक्रार दाखल झाल्यानंतर, पोलिसांचं एक पथक तयार करण्यात आलं आणि या प्रकरणाचा विविध दृष्टिकोनातून तपास करण्यात आला. संबंधित व्यक्तींचे मोबाईल फोन तपासण्यात आले आणि पुरावे सुद्धा तपासण्यात आले. तपासादरम्यान सत्य उघडकीस आलं आणि पोलिसांनी आरोपी आशुतोषला अटक केली.
ADVERTISEMENT











