चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. संपत्तीच्या वादातून भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात आरोपी आई देखील गंभीररित्या जखमी झाली असून तिची प्रकृती सध्या नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
मृत बहिणीचं नाव संजीवनी शंकर भोंडे (32) असल्याची माहिती आहे. तसेच, सूरज शंकर भोंडे (28) अशी आरोपी तरुणाची ओळख समोर आली आहे. या हल्ल्यात आई पुष्पा शंकर भोंडे (58) गंभीररित्या जखमी झाली असून तिची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, मागील तीन-चार दिवसांपासून घरात संपत्तीच्या कारणावरून सतत वाद सुरू होते. एकाच घरात आई आणि बहीण तसेच आरोपी भाऊ आणि वडील वेगवेगळे राहत होते, असं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: नागपूर: पोलीस कर्मचाऱ्याची अंबाझरी तलावात उडी मारून आत्महत्या! मुलांच्या कस्टडीवरून पत्नीसोबत वाद झाल्याने टोकाचं पाऊल...
संपत्तीच्या वादातून बहिणीला संपवलं
या कुटुंबात घराच्या मालमत्तेवरून वारंवार वाद व्हायचे. या वादामुळे रागाच्या भरात आरोपीने घरातील धारदार तलवारीने आपल्या बहिणीचा गळा चिरला. तसेच, मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या आईवरही आरोपी तरुणाने हल्ला केल्याची माहिती आहे. त्यानंतर, आई स्वतःला वाचवण्यासाठी पळत असताना मुलाने तिचा पाठलाग केला आणि तलवारीने तिच्यावर हल्ला केला. आईने कसं बसं शेजाऱ्याच्या घरात घुसून तिचा जीव वाचवला, परंतु गंभीररित्या जखमी झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे ही वाचा: सोलापूर: जावयानेच केला सासऱ्याचा खून! ऊसाच्या शेतात गाठून निर्घृण हत्या; नंतर स्वत:वर सुद्धा चाकूने वार...
संबंधित घटनेची माहिती मिळताच, भद्रावती पोलीस त्वरीत घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपी सूरज भोंडेला अटक केली. तसेच, आरोपीच्या वडिलांना सुद्धा चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पोलिसांनी पीडित तरुणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT











