Crime News : अहमदाबादमध्ये उपचारासाठी आलेल्या 25 वर्षीय महिला रुग्णासोबत तपासणीच्या नावाखाली गैरवर्तन केल्याचा आरोप एका डॉक्टरवर करण्यात आला आहे. पोटातील अल्सरच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेची तपासणी करताना डॉक्टरने तिच्या खासगी अवयवांना अनुचित स्पर्श केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी वास्त्रापूर पोलिसांनी डॉ. व्रज सतीशकुमार पटेल याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 64(1) आणि 74 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कलमांमध्ये बलात्कार तसेच महिलेचे कपडे काढण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला किंवा बळाचा वापर केल्यासंदर्भातील तरतुदी आहेत. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली असून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : प्रियकरासोबत राहणाऱ्या महिलेचं 'शुद्धीकरण'; सर्वांसमोर करायला लावलं 'ते' कृत्य, व्हिडिओ व्हायरल
तपासणीच्या वेळी कोणतीही महिला कर्मचारी उपस्थित नव्हती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय महिला अल्सरच्या त्रासामुळे मेमनगर येथील गॅस्ट्रो अँड लिव्हर रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. सुरुवातीच्या तपासणीदरम्यान डॉ. पटेल यांनी तिची तपासणी केली होती. त्यामध्ये सोनोग्राफीचाही समावेश होता. त्यानंतर डॉक्टरांनी तिला औषधे दिली. मात्र औषधांचा कोर्स पूर्ण केल्यानंतरही तिची प्रकृती सुधारली नाही. त्यामुळे 1 ऑक्टोबरच्या संध्याकाळी ती कुटुंबीयांसोबत पुन्हा रुग्णालयात गेली आणि पुढील उपचारांसाठी तिला दाखल करण्यात आले. त्याच रात्री सुमारे 8 वाजता डॉक्टरने तपासणी करण्याच्या कारणाने तिला अंतर्वस्त्रे काढण्यास सांगितले आणि तिच्या स्तनांची तपासणी केल्याचा आरोप महिलेने केला आहे. यावेळी डॉक्टरने हातमोजे घातले नव्हते, तसेच तपासणीच्या वेळी कोणतीही महिला कर्मचारी उपस्थित नव्हती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हातमोजे न वापरता तिच्या प्रायव्हेट पार्टला चुकीचा स्पर्श
यानंतर 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजता पुन्हा गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉक्टरने महिलेला रुग्णालयातील खोली क्रमांक 5 मध्ये नेले आणि दरवाजा आतून बंद केला. पोटाची तपासणी करायची असल्याचे सांगून त्याने महिलेला अंतर्वस्त्रे काढण्यास सांगितल्याचा आरोप आहे. महिला कर्मचारी उपलब्ध नसल्याचे सांगत डॉक्टरने तिची दोन वेळा अशा प्रकारे तपासणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याचदरम्यान डॉक्टरने महिलेच्या खासगी अवयवांशी अनुचित वर्तन केल्याचा तसेच हातमोजे न वापरता तिच्या प्रायव्हेट पार्टला चुकीचा स्पर्श केल्याच आरोप तिने केला आहे. या प्रकारानंतर महिलेने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांच्या मदतीने तिने वास्त्रापूर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डॉ. व्रज सतीशकुमार पटेल याच्याविरोधात BNS कलम 64(1) आणि 74 अंतर्गत गुन्हा दाखल केला. अहमदाबादच्या थलतेज परिसरात राहणाऱ्या आरोपी डॉक्टरला 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयीन आदेशानंतर त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. महिलेवर झालेल्या कथित प्रकाराची परिस्थिती आणि तिला देण्यात आलेल्या उपचारांशी संबंधित बाबींची चौकशी केली जात आहे. तपासादरम्यान मिळणारे पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT












