Crime News, बंगळुरू : शहरातील बीटीएम लेआउट परिसरात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नेहा बिस्वाल हिच्यासोबत घडलेल्या छेडछाडीच्या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नेहा घरी परतण्याच्या मार्गावर व्लॉग रेकॉर्ड करत चालल्या होत्या. त्याच वेळी एका सायकलस्वार मुलाने अचानक त्यांच्या दिशेने येत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण घटना त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
ADVERTISEMENT
घटना 6 नोव्हेंबरची असून ‘@karnatakaportf’ या एक्स अकाउंटवरून या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. इन्स्टाग्रामवर सक्रिय असलेल्या @nehabiswal120 या युजरचा हा व्हिडिओ क्षणात व्हायरल झाला. या प्रकरणावर स्वतः नेहाने दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की, त्या रस्त्यावरून चालत असताना व्हिडिओ शूट करत होत्या. अचानक सायकलवरून आलेल्या एका मुलाने यू-टर्न घेत जाणीवपूर्वक त्यांच्या अगदी जवळ येत त्रास देण्यास सुरुवात केली.
नेहा म्हणाल्या, “त्याने माझी नक्कल काढली, कॅमेऱ्यासमोर खोड्या केल्या आणि नंतर माझ्यासोबत अश्लील वर्तन सुरू केले.” या प्रकारामुळे त्या घाबरून गेल्या व सुरक्षिततेबद्दल चिंतित झाल्या. मुलगा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आसपासच्या नागरिकांनी त्याला पकडून ठेवले. नेहा यांनी पोलिसांना संपर्क साधला असता सर्वांना धक्का बसला—तो मुलगा फक्त 10 वर्षांचा असल्याचे निष्पन्न झाले.
घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी मुलगा लहान असल्याने त्याला माफ करण्याची विनंती केली. मात्र नेहाने कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ दाखवत त्याच्याकडून झालेल्या गैरवर्तनाची खात्री पटवून दिली. त्यानंतर काही नागरिकांनीही नेहाला साथ देत त्या मुलाला सुनावले. तरीही संपूर्ण परिस्थितीत त्या स्वतःला सुरक्षित वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी व्लॉगिंगसारखे साधे काम करतानाही महिलांना असुरक्षित वाटावे, ही निश्चितच चिंतेची बाब आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, मुलाच्या वयाचा विचार करून बाल न्याय कायद्यानुसार योग्य कारवाई केली जाणार असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











