शिक्षक पतीने शिक्षिकेला संपवलं, टबमध्ये बुडवून क्रूरपणे हत्या; असं घडलं तरी काय?

मुंबई तक

10 Aug 2026 (अपडेटेड: 10 Aug 2026, 01:49 PM)

Crime News : शिक्षिका शालिनी यादव यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. पतीने पायऱ्यांवरून पडून टबमध्ये बुडाल्याची कहाणी सांगितली, मात्र पोलिसांना हत्येचा संशय आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिक्षक पतीने शिक्षिकेला संपवलं,

point

टबमध्ये बुडवून क्रूरपणे हत्या; असं घडलं तरी काय?

Crime News : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील सदर कोतवाली परिसरातील नासेपीर मोहल्ल्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी शिक्षक असलेल्या पतीने आपल्या शिक्षिका पत्नीच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केल्याचा संशय आहे. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर पत्नीला पाण्याने भरलेल्या टबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पत्नीचा मृत्यू पायऱ्यांवरून पडून पाण्याच्या टबमध्ये बुडाल्याने झाल्याची खोटी कहाणी पतीने पोलिसांना सांगितली. मात्र घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांमुळे पोलिसांना त्याच्या कथनावर संशय आला.

हे वाचलं का?

हेही वाचा : बीडमधील जातीय द्वेषास कोण कोण जबाबदार? शिरसाटांनी थेट नाव सांगितलं..

नासेपीर मोहल्ल्यात मागील सहा महिन्यांपासून भाड्याच्या घरात 30 वर्षीय दिलीप यादव राहत होते. ते सरकारी शिक्षक आहेत, तर त्यांची 28 वर्षीय पत्नी शालिनी यादव खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. दोघांचे 2018 मध्ये लग्न झाले होते. त्यांना आठ वर्षांचा मुलगा आहे. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कोतवाली पोलिसांना शालिनी यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. दिलीप यांनी पोलिसांना सांगितले की, सकाळी साडेपाच वाजता ते फिरण्यासाठी बाहेर गेले होते. साडेसहाच्या सुमारास घरी परतल्यानंतर शालिनी पाण्याच्या टबमध्ये तोंडाच्या दिशेने पडलेल्या दिसल्या. त्यानंतर त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हेही वाचा : निवडणुकीत दिलेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द, संजय शिरसाट जरांगेंचा उल्लेख करत काय बोलले?

डोक्यावर आणि पायावर गंभीर दुखापतीच्या खुणा

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता शालिनी यांच्या डोक्यावर आणि पायावर गंभीर दुखापतीच्या खुणा आढळल्या. त्यांच्या डोक्यावर एखाद्या जड वस्तूने वार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या पतीच्या कथनावर पोलिसांना संशय आला. घटनास्थळी रक्ताने माखलेले कपडेही आढळले असून, त्यातून हत्या झाल्याचा संशय आणखी बळावला. घटनेची माहिती मिळताच सीओ सिटी प्रमोद कुमार शुक्ला आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. सीओ प्रमोद कुमार शुक्ला यांनी प्रथमदर्शनी ही हत्या असल्याचे दिसत असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, शालिनी यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था अत्यंत खराब झाली. शालिनी यांच्या आईने आपल्या जावयावर गंभीर आरोप करत, आपल्या मुलीची हत्या त्यानेच केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, दिलीप यादव यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच शालिनी यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर एफआयआर दाखल करून पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.