Crime News : लग्नाचा उत्साह, सनई-चौघड्यांचे सूर आणि आनंदाचे वातावरण असलेल्या विवाह सोहळ्यात एका सनकी प्रियकराने रक्ताचा सडा पडलाय. "तू माझी नाहीस तर कोणाचीच होऊ देणार नाही," या विकृत भावनेतून एका एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने थेट स्टेजवर चढून नवरीच्या गळ्यात माळ पडण्यापूर्वीच तिच्यावर गोळ्या झाडल्या. बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील चौसा नगर पंचायत परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून एक वरात बक्सरमधील मल्लाह टोली येथे आली होती. 18 वर्षीय आरती कुमारी हिचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात सुरू होता. वऱ्हाडी मंडळी जेवणाचा आस्वाद घेत होती, तर दुसरीकडे स्टेजवर धार्मिक विधी सुरू होता. नवरी आणि नवरदेव एकमेकांसमोर उभे होते, नातेवाईक फोटो काढण्यात मग्न होते. मात्र, याच गर्दीत मृत्यू दबा धरून बसला होता याची कुणालाच कल्पना नव्हती.
स्टेजवर चढला आणि गोळी झाडली...
धार्मिक विधी सुरू असतानाच, आरोपी दीनबंधू मल्लाह याने तोंडाला रुमाल बांधून अचानक स्टेजवर प्रवेश केला. कोणाला काही समजण्यापूर्वीच त्याने कमरेला लावलेली बंदुक काढली आणि थेट आरतीवर गोळी झाडली. गोळी लागताच आरती रक्ताच्या थारोळ्यात स्टेजवरच कोसळली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे लग्नमंडपात एकच पळापळ आणि किंकाळ्या सुरू झाल्या. गर्दी आणि गोंधळाचा फायदा घेत आरोपी दीनबंधू तिथून पसार झाला.
हेही वाचा : प्रियकरासमोर तरुणीवर 7 जणांकडून आळीपाळीने सामूहिक बलात्कार! बळजबरीने पैशांची मागणी अन्...
एकतर्फी प्रेमातून टोकाचं पाऊल
आरोपी दीनबंधू हा आरतीच्या शेजारीच राहणारा आहे. त्याचे आरतीवर एकतर्फी प्रेम होते. आरतीचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरल्यापासून तो संतापलेला होता. त्याने यापूर्वीही आरतीच्या कुटुंबीयांना धमकी दिली होती की, "आरतीचे लग्न जर दुसऱ्या कोणाशी लावून दिले, तर मी तिला जिवंत सोडणार नाही." मात्र, कुटुंबीयांनी त्याच्या धमक्यांकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. अखेर आपल्या सनकी स्वभावातून त्याने लग्नाच्या दिवशीच हे खळबळजनक कृत्य केले.
नवरीची प्रकृती चिंताजनक
गोळीबाराच्या घटनेनंतर जखमी आरतीला तातडीने सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गोळी वर्मी लागल्याने आणि रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे तिची प्रकृती खालावली. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी तिला तातडीने वाराणसी येथील ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर केले आहे. सध्या आरती मृत्यूशी झुंज देत असून तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस तपास आणि कारवाई
घटनेची माहिती मिळताच मुफस्सिल पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलीस निरीक्षक चंदन कुमार यांनी सांगितले की, "हा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपीची ओळख पटली असून त्याच्या अटकेसाठी ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहे. लग्नमंडपातील प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत." या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, एका तरुणाच्या टोकाच्या निर्णयामुळे दोन कुटुंबांच्या आनंदावर विरजण पडले आहे. नवरी मुलगी सुखरूप राहावी यासाठी कुटुंबीय प्रार्थना करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











