Crime News : तेलंगणाच्या सिद्धिपेट जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या 23 वर्षीय सर्जन (डॉक्टर) तरुणीच्या कथित आत्महत्येच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. लग्नाचे आमिष दाखवून नंतर जातीय कारणांवरून नकार दिल्यामुळे मानसिक तणावात सापडून तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वरिष्ठ निवासी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जानेवारी रोजी सिद्धिपेट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात ही घटना घडली. संबंधित तरुणीने हर्बीसाइड अर्थात तणनाशक रसायनाचे इंजेक्शन स्वतःला टोचून घेतले. त्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. वसतिगृहातील मैत्रिणींना ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने तिला सिद्धिपेटमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारांसाठी तिला हैदराबाद येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच 4 जानेवारीच्या पहाटे तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा : बीड : मानलेल्या भावास आत्महत्येपासून रोखताना प्राध्यापक मडॅम 80 टक्के भाजल्या, अशा अवस्थेही जबाब दिला
या प्रकरणी मृत तरुणीच्या बहिणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, संबंधित वरिष्ठ निवासी डॉक्टरने तरुणीशी प्रेमसंबंध ठेवून तिला लग्नाचे आश्वासन दिले होते. मात्र नंतर जातीय कारणांचा दाखला देत लग्नास नकार दिला. या अपमानामुळे आणि मानसिक छळामुळे तरुणी प्रचंड तणावात होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी वरिष्ठ निवासी डॉक्टरला अटक करण्यात आली असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. दोघांमधील संबंध, संवाद, तसेच कॉलेजमधील इतर बाबींचाही तपास केला जात आहे. मृत्यूमागील नेमकी कारणे स्पष्ट करण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृत तरुणी ही जोगुलांबा–गडवाल जिल्ह्यातील अत्यंत गरीब कुटुंबातून आलेली होती. तिने सामाजिक कल्याण वसतिगृहातील शाळेत शिक्षण घेतले होते. तिच्या कष्टाळू वृत्तीमुळे 2020 साली सिद्धिपेटच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळवला. सध्या ती हाऊस सर्जन म्हणून कार्यरत होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणी अभ्यासात हुशार तर होतीच, पण खेळ, सांस्कृतिक उपक्रम आणि इतर उपक्रमांमध्येही ती सक्रिय होती. तिचे आई-वडील रोजंदारीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर तिची मोठी बहीण सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर वैद्यकीय महाविद्यालयात तसेच संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अनेक डॉक्टर संघटना आणि सामाजिक संघटनांनी घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू असून, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : संजय राऊत समोर दिसले, एकनाथ शिंदेंचा नमस्कार,दोघांमध्ये काय चर्चा झाली? पाहा व्हिडीओ
ADVERTISEMENT











