Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे, जिथे देशरक्षण करणाऱ्या एका बीएसएफ (BSF) जवानाची त्याच्याच पत्नीने प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केली. या प्रकरणाचा छडा लावताना पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला असून, 28 मार्च रोजी धनपूर गावात मृत अवस्थेत सापडलेल्या नैन सिंह या जवानाच्या हत्येचा सूत्रधार त्याची पत्नी कोमल असल्याचे निष्पन्न झाले आहे. कोमलचे तिच्याच मावल भावाशी, गुलशनशी अनैतिक संबंध होते आणि याच संबंधांच्या आड येणाऱ्या पतीला कायमचे रस्त्यातून हटवण्यासाठी तिने हा भयंकर कट रचला होता. सुरुवातीला या प्रकरणाचे स्वरूप वेगळे वाटत असले तरी, पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या हत्येचे गुढ उकलले असून, पत्नीसह 5 जणांना गजाआड केले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : रूपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स, अंजली दमानियांनी CDR ची कॉपी काढली; सनसनाटी आरोप
दागिने गहाण ठेवून पतीच्या हत्येसाठी दिली सुपारी
इंचौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनपूर गावात 28 मार्च रोजी नैन सिंह यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात त्यांच्याच घरात आढळला होता. तपासादरम्यान असे समोर आले की, नैन सिंह यांना पत्नी कोमल आणि तिचा मावस भाऊ गुलशन यांच्यातील प्रेमसंबंधांची भनक लागली होती. या कारणावरून पती-पत्नीत वारंवार वाद होत असत आणि नैन सिंह अनेकदा गुलशनला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असे. आपल्या अनैतिक प्रेमात पती अडथळा ठरत असल्याचे पाहून कोमलने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक बाब म्हणजे, आपल्या पतीची हत्या करण्यासाठी कोमलने स्वतःचे सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते आणि त्यातून मिळालेले पैसे प्रियकर गुलशनला दिले होते. या पैशांच्या जोरावर गुलशनने त्याचे मित्र राहुल, गुड्डू आणि मोंटू यांना या कटात सामील करून घेतले आणि 27-28 मार्चच्या मध्यरात्री नैन सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेजमुळे फुटले बिंग आणि पोलिसांची कारवाई
सुरुवातीला जवानाच्या कुटुंबीयांनी शेजाऱ्यांशी असलेल्या जुन्या वादातून ही हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केला होता, परंतु पोलिसांनी वैज्ञानिक पद्धतीने तपास केल्यावर सत्य बाहेर आले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मध्यरात्रीच्या वेळी घराचा दरवाजा उघडल्याचे आणि आतून प्रकाश बाहेर आल्याचे दिसून आले, ज्यामुळे घरातीलच कोणाचा तरी या गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय बळावला. कोमल ही गेल्या काही काळापासून पतीपासून वेगळी राहत होती, परंतु तिने रचलेल्या या सुनियोजित कटाचा पर्दाफाश पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच केला. मेरठचे एसएसपी अविनाश पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचही आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. पत्नीने आपल्याच कुंकवाचा बळी घेण्यासाठी जे पाऊल उचलले, ते पाहून पोलीस प्रशासनही थक्क झाले असून या प्रकरणातील प्रत्येक आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे.
पाच आरोपींना अटक आणि हत्यारांचा शोध
पोलिसांनी या कारवाईत पाचही आरोपींना, म्हणजेच गुलशन, राहुल ऊर्फ पवन, गुड्डू, मोंटू आणि मयत जवानाची पत्नी कोमल यांना अटक केली आहे. आरोपींच्या माहितीवरून हत्येसाठी वापरण्यात आलेली रिकामी काडतुसे आणि जिवंत काडतुसे देखील हस्तगत करण्यात आली आहेत. हा संपूर्ण हत्याकांड अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला होता, ज्याचा मुख्य उद्देश अनैतिक संबंध उघड होऊ नयेत हाच होता. पतीला मारण्यासाठी कोमलने दागिने गहाण ठेवून दिलेली सुपारी या प्रकरणातील क्रूरता दर्शवते. सध्या सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात सबळ पुरावे सादर करण्याची तयारी करत आहेत. देशसेवेसाठी तैनात असलेल्या जवानाचा घरातच असा अंत झाल्यामुळे संपूर्ण धनपूर गावात शोककळा पसरली असून संताप व्यक्त केला जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











