Dharashiv Murder, गणेश जाधव/धाराशिव-तुळजापूर : धाराशिवच्या नळदुर्गमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कुटुंबनियोजन आणि दुसऱ्या लग्नावरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही घटना 16 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील तुळजापूर तालुक्यातील अणदूर शिवारातील चिकणी तांडा येथे शेतात घडली. या घटनेत महिपती आंबाजी सुरवसे (वय 45, रा. मानेवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबई महापालिकेत मविआ सत्तेपासून 15 जागा दूर राहिली, अन् ठाकरे गट अन् काँग्रेसला 30 जागांवर मतविभाजनचा फटका
कुटुंबनियोजनावरून व संपत्ती विभागणी वरून वाढत गेलेला वाद
दोन मुले आणि एक मुलगी असताना कुटुंबनियोजन करून घ्यावे असा सल्ला देणाऱ्या मुलाकडे पित्याने सतत दुर्लक्ष केल्याने घरात तणाव निर्माण झाला होता. सावत्र आईला आणखी मुले झाल्यास संपत्तीत वाटेकरी वाढतील या भीतीपोटी तसेच वडिलांनी कुटुंबनियोजनास विरोध केल्यामुळे संतप्त झालेल्या अल्पवयीन मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मयत शेतकऱ्याला दोन बायका होत्या. पहिली पत्नी मरण पावल्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले होते. पहिल्या पत्नीपासून दोन मुले तर दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगी आहे. भविष्यात आणखी मुले झाल्यास आमच्या वाट्याची संपत्ती विभागली जाईल या भीतीने पहिल्या पत्नीची दोन्ही मुलं वडिलांकडे सावत्र आईचे कुटुंबनियोजन करण्याची वारंवार मागणी करत होती. मात्र, पित्याने याकडे दुर्लक्ष केल्याने घरात सतत वाद होत होते.
शेतात झोपेत असताना हल्ला
शुक्रवारी दुपारी वडील आपल्या शेतात गेले होते. हीच संधी साधत 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा त्यांच्या मागावर शेतात पोहोचला. शेतात काम करून वडील गाढ झोपलेले असल्याचे पाहून रागाच्या भरात बाजूला पडलेला मोठा दगड उचलून त्याने थेट वडिलांच्या डोक्यात घातला. हा प्रहार इतका भीषण होता की महिपती सुरवसे रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा : पतीने नवा मोबाईल घेऊन दिला नाही... नैराश्यात गेलेल्या पत्नीने संपवलं आयुष्य!
हत्येनंतर हॉटेलमध्ये जेवण; नंतर स्वतःहून पोलिसांत हजर
वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपी मुलाने कोणताही थरकाप न दाखवता मोटरसायकल काढली आणि तो नळदुर्ग शहरात आला. तेथील एका हॉटेलमध्ये पोटभर जेवण केल्यानंतर तो थेट नळदुर्ग पोलीस ठाण्यात हजर झाला. 'मी माझ्या वडिलांचा खून केला आहे, मला अटक करा' अशी थेट कबुली त्याने पोलिसांसमोर दिली. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला धाराशिव येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून घटनास्थळ पंचनामा व पुरावे जप्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. नळदुर्गमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT











