गर्भवती नर्तिकेला मृत समजून जंगलात जिवंत जाळले, कलाकेंद्रातील वादाचा भयंकर शेवट!

मुंबई तक

28 Sep 2026 (अपडेटेड: 28 Sep 2026, 04:39 PM)

Dharashiv Crime News : कलाकेंद्रातील वादाचा भयंकर शेवट! गर्भवती नर्तिकेची हत्या करून 275 किमी दूर जंगलात जाळले. 11 तासांचे CCTV फुटेज तपासून पोलिसांनी उकलला थरारक गुन्हा

Dharashiv Crime News

Dharashiv Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

गर्भवती नर्तिकेला मृत समजून जंगलात जिवंत जाळले

point

कलाकेंद्रातील वादाचा भयंकर शेवट!

Dharashiv Crime News, गणेश जाधव : कलाकेंद्रातील अंतर्गत वादाने अखेर एका गर्भवती नर्तिकेचा जीव घेतला. मारहाणीत बेशुद्ध पडलेल्या नर्तिकेला मृत समजून आरोपींनी तिचा मृतदेह तब्बल 275 किलोमीटर दूर नेला आणि निर्जन जंगलात पेट्रोल टाकून जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. धुळे पोलिस आणि धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन दिवसांत या थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली असून दोन आरोपी अजूनही फरार आहेत.
 
मृत नर्तिका पिंकी हनुमंत काटकर (31, रा. रायगड) ही अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रावर काम करत होती. धुळे जिल्ह्यातील नरव्हाळ परिसरातील गरताडबारी घाटाजवळील जंगलात तिचा जळालेला मृतदेह आढळून आल्यानंतर संपूर्ण तपासयंत्रणा हादरली होती.

हे वाचलं का?

कलाकेंद्रातील वादातून हत्येचा कट

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पिंकी काटकर हिचा कलाकेंद्रातील काही व्यक्तींशी वाद झाला होता. त्यानंतर बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा चौफुलीजवळील एका घरात तिच्यावर बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर ती बेशुद्ध पडली. ती मृत झाल्याचा समज झाल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : धुळे : कला केंद्रातील महिलेला पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, मृतदेह पाहावेना; क्रूरतेचा कळस!
 
यानंतर आरोपींनी तिला वाहनात टाकून राजस्थानच्या दिशेने निघाल्याचे तपासात उघड झाले आहे. मात्र धुळे जिल्ह्यातील गरताडबारी घाट परिसरातील निर्जन जंगलात वाहन थांबवून तिच्या अंगावर पेट्रोल टाकण्यात आले आणि तिला जाळण्यात आले.

जंगलात जळालेला मृतदेह, पोलिसांसमोर मोठे आव्हान

22 सप्टेंबर रोजी चाळीसगाव-धुळे महामार्गालगतच्या वनक्षेत्रात एका महिलेचा गंभीररित्या जळालेला मृतदेह आढळला. मृतदेहाची ओळख पटवणे आणि आरोपींपर्यंत पोहोचणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. फॉरेन्सिक तपास आणि घटनास्थळावरील पुरावे गोळा करून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.सदर महिला ही धाराशिव येथील महाकाली कला केंद्रात काम करत होती तेथेच तिची व आरोपींची ओळख झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 11 तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींपर्यंत पोहोचले.

हेही वाचा : महिला पोलीस उपनिरीक्षकासोबत गैरवर्तन, फिटनेस क्लबच्या मालकावर गुन्हा दाखल

धाराशिव एलसीबीची महत्त्वाची भूमिका
 
स्थानिक गुन्हे शाखेने महामार्गावरील तब्बल 11 तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. संशयित वाहनाचा माग काढत पोलिस थेट जामखेडमधील सप्तसूर कला केंद्रापर्यंत पोहोचले. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि वाहनाच्या हालचालींचा मागोवा घेत सहा संशयितांची ओळख पटवण्यात आली.
 या प्रकरणात सर्फराज ऊर्फ शफीक अलीम मोमीन (38), आरिफ ऊर्फ खुज्या आसिफ शेख (31), लक्ष्मी बालाजी पवार (30) आणि स्वाती ऊर्फ आरती गणेश कुऱ्हाडे (28) यांना अटक करण्यात आली आहे. फारुख शेख आणि रोहिणी जाधव हे दोघे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
 
आरोपीवर यापूर्वीही गुन्हे
 
अटक करण्यात आलेल्या सर्फराज ऊर्फ शफीक मोमीन याच्याविरुद्ध धाराशिव आणि बीड जिल्ह्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून या हत्येमागील नेमका वाद आणि संपूर्ण कटाचा तपास अद्याप सुरू आहे. या प्रकरणाने कला केंद्रांच्या आड सुरू असलेल्या काळ्या वास्तवाची पुन्हा एकदा चर्चा सुरू केली आहे.