Gujrat neighbours dispute : दोन शेजाऱ्यांची भांडणं होणं यात काही नवीन नाही. हे भांडण थोडक्यातच मिटलं तर बरं, अन्यथा हे भांडण जीवघेणंही ठरु शकतं. गुजरातमधील अशाच शेजाऱ्यांचा वाद एका व्यक्तीच्या जीवावर बेतला आहे. घराच्या व्हरांड्यात बसण्यावरुन हा वाद सुरु झाला. मात्र हा वाद इतका टोकाला गेला की चौघांनी मिळून त्यांच्या शेजाऱ्याला डिझेल ओतून पेटवून दिले. यामध्ये त्या शेजाऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे. गुजरातच्या कच्छमधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ट्रेन उशीरा आल्याने पेपर चुकला, आता विद्यार्थीनीला भरपाई म्हणून 9 लाख रुपये मिळणार!
धारदार शस्त्राने हल्ला
कच्छच्या रोटरीनगर परिसरात ही घटना घडली. घराच्या व्हरांड्यात बसण्यावरुन शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. यामध्ये करसन महेश्वरी वय ५० यांचा मृ्त्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करसन माहेश्वरी यांचा शेजारी राहणाऱ्या तीन महिला आणि एका पुरुषासोबत घराच्या व्हरांड्यात बसण्यावरुन वाद झाला. या वादात शेजाऱ्यांनी करसन यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. आपला जीव वाचवण्यासाठी करसन तिथून पळून गेले आणि बाथरुममध्ये जाऊन लपले.
अंगावर डिझेल ओतून पेटवले
मात्र आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. त्यांना बाथरुममधून बाहेर ओढून त्यांच्या अंगावर डिझेल ओतले आणि पेटवून दिले. त्याच अवस्थेत करसन घरातून बाहेर पळाले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक लोक गोळा झाले. स्थानिकांनी आगीत होरपळणाऱ्या करसन यांच्यावर पाणी ओतून आग विझवली. यानंतर अॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना तातडीने भूज येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान, करसन यांचा मृत्यू झाला.
दोन महिलांना अटक, एक फरार
मृताचे मोठे भाऊ हिराभाई माहेश्वरी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचा भाऊ अविवाहित होता आणि तो आईसोबत रहात होता. व्हरांड्यात बसण्यावरुन त्यांचा शेजाऱ्यांशी सतत वाद होत असे. यातूनच भावाची हत्या झाल्याचे हिराभाई म्हणाले. दरम्यान, पोलिसांना प्रेमिलाबेन, अंजुबेन आणि मंजुबेन या तीन महिलांची ओळख पटली आहे. यापैकी दोन महिला आणि त्यांच्या पुरुष साथीदाराला ताब्यात घेतले आहे; तर एक महिला अद्याप फरार आहे. या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











