Crime News : जयपूरच्या वैशाली नगरमधील हॉटेलच्या रूम नंबर 204 मध्ये अवैध ऑनलाइन सट्टा लावण्यात येत असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना हॉटेलमध्ये ऑनलाइन जुगार आणि सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली. पोलिसांनी खोलीचा दरवाजा ठोठावल्यानंतर आत दोन युवक आणि एक युवती आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी खोलीची झडती घेतली असता मोबाइल, लॅपटॉप आणि टॅबलेटसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आढळून आली. या उपकरणांची तपासणी सुरू केल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असल्याचे समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर प्रकरण : मुरलीधर चांदगुडे काम करत होते, तिथल्या लोकांनी काय खुलासे केले?
क्रिकेटसह इतर खेळांवर ऑनलाइन पैसे लावले जात असल्याचा आरोप
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या खोलीतून सुमारे 6 लाख रुपयांच्या व्यवहाराचा हिशोब मिळाला आहे. तसेच आरोपींचा अंदाजे मासिक अवैध व्यवसाय सुमारे 18 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. क्रिकेटसह इतर खेळांवर ऑनलाइन पैसे लावले जात असल्याचा आरोप आहे. मैदानावर सामना सुरू असताना त्याच्या निकालावर हॉटेलच्या खोलीत बसून पैशांचा खेळ सुरू असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन लॅपटॉप, एक टॅबलेट आणि पाच मोबाइल जप्त केले आहेत.
हेही वाचा : 'काका आणि तीन भावांनी माझ्यासोबत...' पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेसोबत घडलं भयंकर
एकाच ठिकाणी थांबून ऑनलाइन सट्ट्याचा व्यवसाय
पोलिसांच्या माहितीनुसार, पकडलेल्या आरोपींची ओळख नेपाळमधील अशोक पौडेल, परीना गिरी आणि पुण्यातील पवन वैष्णव अशी झाली आहे. प्राथमिक चौकशीत हे आरोपी एकाच ठिकाणी थांबून ऑनलाइन सट्ट्याचा व्यवसाय करत नसल्याचे सांगण्यात आले आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणी आपले ठिकाण बदलत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे हॉटेलमधील रूम नंबर 204 हे या कथित सट्टेबाजीसाठी वापरलेले एक ठिकाण असल्याचा पोलिसांचा संशय आहे. यापूर्वी हा व्यवहार कोणकोणत्या ठिकाणांहून चालवला गेला आणि आरोपींच्या संपर्कात कोणकोणते लोक होते, याचा तपास सुरू आहे.
पोलिस आता जप्त केलेल्या मोबाइल, लॅपटॉप आणि टॅबलेटची तांत्रिक तपासणी करत आहेत. या उपकरणांमधील चॅट, ऑनलाइन व्यवहार, सट्ट्याशी संबंधित अकाउंट आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. आरोपींनी लोकांकडून पैसे कोणत्या माध्यमातून घेतले तसेच कोणत्या बँक खात्यांमधून किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रकमेची देवाणघेवाण केली जात होती, याचाही शोध घेतला जात आहे. सध्या जयपूरमधील हॉटेलचा रूम नंबर 204 पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी असून, एका खोलीत सापडलेल्या तीन व्यक्तींपासून सुरू झालेला तपास कथित 6 लाख रुपयांच्या व्यवहारापासून सुमारे 18 लाख रुपयांच्या अंदाजे मासिक व्यवसायापर्यंत पोहोचला आहे.
ADVERTISEMENT












