Jalgaon Crime News : जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात शनिवारी (दि. ३ मे) रात्री 11 वाजेच्या सुमारास 30 वर्षीय तरुणाची हत्या झाली. धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपण या तरूणाला संपवण्यात आलं. या प्रकरणात आता एक मोठा ट्वीस्ट आला आहे. मयत तरुणाच्या पत्नीच्या अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, पत्नीनेच मारेकऱ्यांना पतीचा पत्ता दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी पाच संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> HSC Result 2025 : 12 वीचा विभागनिहाय निकाल जाहीर, कोकण आणि पुण्याचा नंबर कितवा?
मयत तरुणाचं नाव आकाश पंडित भावसार (वय 30, रा. अयोध्या नगर, जळगाव) असं आहे. तो ट्रान्सपोर्ट नगरमध्ये वाहन भरण्याचं काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि त्याची पत्नी पूजा यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. पूजा सातत्याने माहेरी जात असल्यानं दोघांमध्ये तणाव होता.
घटना कशी घडली?
शनिवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास पूजाचा मावस भाऊ अजय मंगेश मोरे, चेतन रवींद्र सोनार आणि तीन अनोळखी व्यक्ती दोन स्कूटींवर आकाशच्या घरी आले. त्यांनी आकाशबद्दल विचारणा केली. यावेळी पूजाने आकाशला फोन करून त्याचे ठिकाण विचारलं. आकाशने "श्री प्लाझा, ए वन भरीत सेंटर जवळ" असल्याचं सांगितलं. ही माहिती मिळताच अजय, चेतन आणि त्यांचे साथीदार श्री प्लाझा परिसरात पोहोचले. तिथे त्यांनी आकाशला घेरून धारदार शस्त्रानं त्याच्यावर हल्ला केला. आकाशच्या मांडीवर, छातीवर आणि गुप्तांगावर गंभीर वार करण्यात आले.
हे ही वाचा >> HSC 12th Result 2025 : दुपारी 1 वाजता लागणार बारावीचा निकाल, अशी डाऊनलोड करा तुमची मार्कशीट
हल्ल्यावेळी आकाशसोबत असलेले शैलेश पाटील आणि वैभव मिस्तरी घाबरून पळून गेले. जीव वाचवण्यासाठी आकाश रस्त्याच्या पलीकडे पळाला, परंतु मारेकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून पुन्हा वार करत त्याला गंभीर जखमी केले. यानंतर कुणाल सोनार यांच्या मदतीने आकाशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
पत्नीच्या अनैतिक संबंधातून खून
आकाशच्या आई कोकिळाबाई पंडित भावसार (वय ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी अजय मंगेश मोरे याचे पूजा यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. अजय अधूनमधून आकाशच्या घरी येत होता. यावरून आकाश आणि अजय यांच्यात वाद झाले होते. याच रागातून अजयने आपल्या साथीदारांसह सूडबुद्धीने आकाशचा खून केल्याचा आरोप फिर्यादीत आहे. तसेच, चार दिवसांपूर्वी मारेकऱ्यांनी आकाशला जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती आकाशच्या बहिणीने रुग्णालयात दिली.
पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये अजय मंगेश मोरे, चेतन रवींद्र सोनार आणि तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सफोनी साजिद मंसूरी तपास करत आहेत. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कसून प्रयत्न सुरू केले आहेत.
ADVERTISEMENT
