Crime News : कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या वसतिगृहात रविवारी रात्री एका 9 वीच्या विद्यार्थ्याने धुमाकूळ घातला. किरकोळ वादातून या विद्यार्थ्याने आपल्या वर्गमित्रांवर लोखंडी रॉडने भीषण हल्ला केला, ज्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आरोपी विद्यार्थी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शाळेच्या व्यवस्थापनाने हा हल्ला लोखंडी रॉडने झाल्याचे म्हटले असले तरी, मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाने मात्र त्याला चाकूने भोसकल्याचा दावा केला आहे आणि शाळा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बलात्कार पीडितेकडे गावाला मटण अन् दारुची पार्टी देण्याची मागणी, पंचायतीचा अजब निर्णय; पोलिस काय करताहेत?
विद्यार्थी झोपेत असताना हल्ला
प्राथमिक तपासानुसार, ही घटना रात्रीच्या जेवणानंतर घडली जेव्हा वसतिगृहातील सर्व विद्यार्थी झोपले होते. आरोपीने पलंगाचा लोखंडी रॉड काढून झोपलेल्या अनेक विद्यार्थ्यांवर सपासप वार केले. इतकेच नाही तर त्याने वसतिगृह अधीक्षकांवरही हल्ला केल्याचे समोर आले आहे. या रक्तरंजित हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने बेल्लारी येथील विजयनगर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (VIMS) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
शाळा प्रशासनाचा निष्काळजीपणा
या घटनेमुळे मृत विद्यार्थ्याच्या पालकांना मोठा धक्का बसला असून त्यांनी शाळा प्रशासनाला या दुर्घटनेसाठी जबाबदार धरले आहे. आरोपी हा अमली पदार्थांच्या आहारी गेलेला असू शकतो, असा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. वसतिगृहासारख्या सुरक्षित ठिकाणी एक अल्पवयीन मुलगा इतका भीषण हल्ला कसा काय करू शकतो, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलाचा जीव गेल्याचा आरोप पालकांनी केला असून याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
हे ही वाचा : नातवाने आजीवर केला बलात्कार, नंतर नाक आणि तोंडाचा चावा घेत केली निर्घृण हत्या; हादरवून टाकणारं प्रकरण
फरार विद्यार्थ्याचा शोध सुरु
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. फरार आरोपी विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. हा हल्ला नेमका कोणत्या वादातून झाला आणि त्यामागे काही जुने वैमनस्य होते का, याचा शोध पोलीस घेत आहेत. बेल्लारी जिल्ह्यातील या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ADVERTISEMENT











