Karnataka nurse murder : कर्नाटकच्या कोलारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २७ वर्षीय तरुणाने नर्सवर धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला आहे. चिरंजीवी असं या तरुणाचं नाव आहे. कोलार शहरातील बस डेपोजवळ ही घटना घडली. पीडिता कामावर जात असताना आरोपीने तिच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. हल्ला झाल्याचे लक्षात येताच जमावाने आरोपीला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : वहिनीचे अनैतिक संबंध, तिच्यासह प्रियकराची हत्या अन् बहिणीला सुद्धा... शेवटी पोलीस ठाण्यात पोहोचून सरेंडर
कामावर जात असताना झाला हल्ला
सुजाता असं पीडित महिलेचे नाव असून ती एका खाजगी दवाखान्यात काम करत होती. सकाळी ती कामावर जात असताना आरोपी चिरंजीवीने तिला अडवून तिच्यावर धारधार शस्त्राने वार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये वाद झाल्यानंतर चिरंजीवीने धारदार शस्त्र बाहेर काढले आणि सुजातावर सहा वार केले. आजूबाजूला लोक असूनही हा हल्ला झाल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. हल्ल्यानंतर सुजाता जागीच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.
नात्यातील दुराव्यामुळे आरोपी संतप्त
चिरंजीवी आणि सुजाता हे दोघे एक वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. मात्र काही कारणांमुळे त्यांच्या नात्यात अलीकडेच बेबनाव निर्माण झाला होता. त्यामुळे सुजाताला हे नाते संपवायचे होते. मात्र चिरंजीवीचा याला आक्षेप होता. दोघांमध्ये होणाऱ्या सततच्या मतभेदांमुळे सुजाता त्याच्यापासून दूर राहत होती. यामुळे संतप्त होऊन चिरंजीवीने तिच्यावर हल्ला केला.
हे ही वाचा : संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंचा 'जयचंद' म्हणून उल्लेख, तिकडं निशिकांत दुबे संतापले, नेमकं काय म्हणाले?
उपस्थितांनी दिला चोप
हल्ला झाल्यानंतर चिरंजीवीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी चिरंजीवीला पकडले आणि चांगलाच चोप दिला. यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी चिरंजीवीला अटक केली असून भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT











