Crime News : रुसून माहेरी गेलेल्या बायकोला परत बोलावण्यासाठी एखादा नवरा काय करेल असं वाटतं तुम्हाला? तो आपल्या बायकोचा रुसवा काढेल, जास्त काही असेल तर नातेवाईकांच्या मध्यस्थीने तोडगा काढेल. मात्र मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील एका पठ्ठ्याने बॉम्ब बनवून थेट मंदिराजवळ स्फोटच केला आहे. या घटनेमुळे सगळेच जण हैराण झाले आहेत. सुरुवातीला या स्फोटामागे काही दहशतवाद्यांचा हात असल्याची चर्चा रंगली होती. मात्र पोलिस तपासानंतर सर्वांनाच धक्का बसला.
ADVERTISEMENT
या प्रकरणी 30 वर्षीय आरोपी गोलू पटेल याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या स्फोटात एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाले होते. आरोपीने एका ब्लूटूथ स्पीकरमध्ये डेटोनेटरसारखा बॉम्ब फिट करून तो मंदिराच्या परिसरात ठेवला होता. आपल्या सासरच्या मंडळींना यामध्ये गोवण्यासाठी त्याने हा भयानक कट रचल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे.
मेव्हण्यांना अडकवण्याची योजना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोलू पटेलची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. तिला परत मिळवण्यासाठी त्याने आपल्या मेव्हण्यांना गुन्ह्यात अडकवण्याची योजना आखली. यासाठी त्याने मंदिराच्या पुजाऱ्याला एक बनावट संदेशही पाठवला होता, ज्यामध्ये त्याने पत्नीच्या भावांच्या नावांचा उल्लेख केला होता. स्फोटानंतर पोलीस त्याच्या मेव्हण्यांना अटक करतील आणि घाबरून त्याची पत्नी परत येईल, असा त्याचा डाव होता. आरोपीने यापूर्वी एका मायनिंग कंपनीत काम केले असल्याने त्याला स्फोटकांचा तांत्रिक अनुभव होता, ज्याचा वापर त्याने हा बॉम्ब बनवण्यासाठी केला.
हे ही वाचा : शिवनिका संस्थानसाठी 39 लाख लिटर पाणी देण्यास देण्यात आली होती मंजुरी, कॅप्टन खरातचा शासन दरबारी होता दबदबा
11 वर्षांची मुलगी गंभीर जखमी
हा स्फोट घडवण्यासाठी आरोपीने सहा सुतळी बॉम्बमधून दारूगोळा काढून तो ब्लूटूथ स्पीकरमध्ये अत्यंत चाणाक्षपणे बसवला होता. दुर्दैवाने, एका 11 वर्षांच्या मुलीने हा स्पीकर मोबाईलला कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच क्षणी जोरदार स्फोट झाला. या दुर्घटनेत ती मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस अधीक्षक लोकेश कुमार सिन्हा यांनी तपासासाठी सहा पथके तैनात केली होती. सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक पुरावे गोळा करून पोलिसांनी अखेर गोलू पटेलच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हे ही वाचा : हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये अडकलं कुटुंब, आरडाओरडा केला तरी स्टाफ आलाच नाही; बायको आणि मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा तडफडून मृत्यू
परिसरात दहशतीचे वातावरण
सध्या पोलीस आरोपीची अधिक सखोल चौकशी करत असून, त्याने ही स्फोटके कोठून मिळवली आणि या कटात त्याला आणखी कोणी मदत केली का, याचा शोध घेतला जात आहे. नवरात्रीच्या उत्साहाच्या वातावरणात अशा प्रकारच्या कृत्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी वेळीच आरोपीला अटक केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. या प्रकरणातील जखमी मुलीवर उपचार सुरू असून, पोलीस प्रशासन या गुन्ह्यातील सर्व दुवे जोडण्याचे काम करत आहे.
ADVERTISEMENT











