Crime News : एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षिका असलेल्या सुनेने संपत्तीच्या वादातून आपल्याच सासऱ्याची निर्घृण हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, हत्येपूर्वी आरोपी सुनेने सासऱ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि त्यानंतर इतर साथीदारांच्या मदतीने फावड्याच्या लाकडी दांड्याने डोक्यावर गंभीर वार करून त्यांचा जीव घेतला. मृत व्यक्तीचे नाव सच्चाराम गुप्ता असे असून त्यांच्या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नही करण्यात आला. उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
सूनेची सासऱ्याकडे 'ती' मागणी
पोलीस तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, मृत सच्चाराम गुप्ता यांना दोन मुले आहेत. त्यांची मोठी सून शोभा हिची मागणी होती की सासऱ्याने सगळी संपत्ती तिच्या नावावर करावी. मात्र, सच्चाराम यांना आपल्या दोन्ही मुलांना संपत्तीचा समान वाटा द्यायचा होता. याच कारणावरून कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता आणि हे प्रकरण दिवाणी न्यायालयापर्यंतही पोहोचले होते. तरीही वाद न मिटल्याने सुनेने सासऱ्यांना वाटाघाटीच्या बहाण्याने घरी बोलावून घेतले आणि हे हत्याकांड घडवून आणले.
हे ही वाचा : वसई : 32 कोटींसाठी उद्योगपतीच्या हत्येचा कट, थेट गाठून गोळ्या झाडल्या, पण...
अशी केली हत्या
या गुन्ह्यात मुख्य आरोपी सुनेला इतर साथीदारांनीही मदत केली. गप्पा मारत असताना वाद विकोपाला गेल्यानंतर शोभाने सासऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली, ज्यामुळे ते वेदनेने जमिनीवर कोसळले. त्यानंतर तिथे आधीच उपस्थित असलेल्या रमेश गुप्ता आणि धनई यादव या कथित डॉक्टराने त्यांना पकडून ठेवले, तर शोभाने फावड्याच्या लाकडी दांड्याने सासऱ्यांच्या डोक्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात सच्चाराम यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी श्रीकांत चौहान नावाच्या व्यक्तीला बोलावून मृतदेहाचा चेहरा कपड्याने बांधण्यात आला आणि रात्रीच्या वेळी तो शेजारच्या रिकाम्या भूखंडात फेकून देण्यात आला.
हे ही वाचा : वेदर रिपोर्ट : पुढील 24 तास धोका, विदर्भानंतर राज्यात रेड, ऑरेंज अलर्ट कुठे?
सुनेसह चौघांना अटक
घटनेची माहिती मिळताच फरेंदा पोलीस ठाण्याच्या पथकाने वेगाने सूत्रे हलवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केवळ चार तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावून मुख्य आरोपी सुनेसह चौघांना अटक केली आहे. हत्येत वापरलेला लाकडी दांडा आणि इतर महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या सर्व आरोपींवर संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












