vasai businessman murder conspiracy, प्रवीण नलावडे : वसईमध्ये 32 कोटी रुपयांच्या आर्थिक फायद्यासाठी उद्योगपतीच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वालीव पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत मुख्य सूत्रधारासह सात आरोपींना अटक केली आहे. वसईतील डायमंड इंडस्ट्रियल इस्टेटमधील जी.एस.एम. फॉइल्स लिमिटेडचे भागीदार मोहनसिंह लक्ष्मणसिंह परमार यांच्यावर 24 जुलै रोजी कंपनीबाहेर गोळीबार करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या भागिदाराने रचला कट
पोलिस तपासात या संपूर्ण कटामागे कंपनीतीलच भागीदार सागर गिरीश भानुशाली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शेअर बाजारातील मोठ्या नुकसानीमुळे आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या भानुशालीने आर्थिक फायद्यासाठी हा कट रचला होता. मोहनसिंह परमार यांच्याकडून त्याला सुमारे 32 कोटी रुपयांचे पेमेंट मिळाले होते. परमार यांची हत्या झाल्यास ही रक्कम परत करण्याची जबाबदारी संपुष्टात येईल आणि कंपनीवर पूर्ण नियंत्रण मिळवता येईल, या उद्देशाने त्याने कट रचल्याचा आरोप आहे. त्यामुळे व्यावसायिक वादातून हा हल्ला घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा : आम आदमी पार्टी का सोडली? आता राजकारणात जायचं की नाही? अभिजीत दिपकेंनी सगळंच सांगितलं
कंपनीच्या बाहेर येताच उद्योगपतीवर गोळीबार
घटनेच्या दिवशी मुख्य शूटर सुजीत देवेंद्रभाई पांडे आणि त्याचा साथीदार अनूप वीरेंद्र प्रजापती हे मोटारसायकलवरून कंपनीबाहेर आले होते. मोहनसिंह परमार कंपनीच्या बाहेर येताच सुजीत पांडेने त्यांच्यावर जवळून गोळी झाडली. त्यानंतर दुसरी गोळी न चालल्याने त्याने पिस्तुलाच्या बटनेही परमार यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर वालीव पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
या तपासादरम्यान पोलिसांचे विशेष पथक उत्तर प्रदेशात पोहोचले आणि तेथून मुख्य शूटर सुजीत पांडे, शस्त्र पुरवठादार मनोज ठठेरा यांच्यासह इतर आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात मुख्य सूत्रधार सागर गिरीश भानुशालीसह एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास वैज्ञानिक, डिजिटल, आर्थिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे सुरू असून या कटामागे आणखी मोठे आर्थिक किंवा संघटित गुन्हेगारी जाळे कार्यरत होते का, याचाही तपास केला जात आहे. याबाबत मीरा-भाईंदरचे अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंत्रे यांनी तपास सर्व बाजूंनी सुरू असल्याची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT












