गाडीला कट मारल्याचा वाद, रीलस्टारवर पुण्याच्या कॅफेत कोयत्याने वार

मुंबई तक

• 08:30 AM • 18 Aug 2026

पुण्यातील एका कॅफेमध्ये पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. एका रील स्टारकडून दुसऱ्या रीलस्टारला कोयत्याने मारहाण करण्यात आली. यामध्ये दुसरा रील स्टार हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रसंगाचा सीसीटीव्ही समोर आला असून पोलिसांनी माधवी कुंभारसह तिच्या साथिदारांना अटक केली आहे.

Pune Crime

Pune Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

गाडीला कट मारल्याचा वाद

point

रीलस्टारवर पुण्याच्या कॅफेत कोयत्याने वार

Pune Crime : सध्या सोशल मीडियावर 'रील स्टार' बनण्याची मोठी क्रेझ तरुणाईमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र, यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या नादात तरुणाई गुन्हेगारीकडे कशी वळत आहे, याचा एक धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. साताऱ्यातील कास पठारवर गाडीचा कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून इन्स्टाग्रामवर सुरू झालेल्या वादाचे रूपांतर चक्क कोयता हल्ल्यात झाले. 15 ऑगस्टच्या मध्यरात्री पुण्यातील एका कॅफेमध्ये ही थरारक घटना घडली असून, पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणीसह सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

हे वाचलं का?

कास पठार ते इन्स्टाग्रामवरील 'कोल्ड वॉर'

माधवी कुंभार (वय 23) आणि अथर्व जगताप हे दोघेही इन्स्टाग्रामवर 'रील स्टार' म्हणून ओळखले जातात. माधवी ही हडपसर भागातील असून महागड्या गाड्या, फॅन्सी नंबर प्लेट आणि बाऊन्सर्ससोबतचे तिचे व्हिडिओ असतात. तर, अथर्वही थार, फॉर्च्युनर सारख्या गाड्या चिखलातून चालवणे आणि स्टंटबाजी करण्याचे व्हिडिओ बनवतो.

काही दिवसांपूर्वी हे दोघेही साताऱ्यातील कास पठार येथे स्टंटबाजीसाठी गेले होते. त्यावेळी अथर्वच्या गाडीचा माधवीच्या गाडीला कट बसला. तिथे त्यांच्यात वाद झाला आणि वरकरणी तो मिटल्यासारखा वाटला. मात्र, त्यानंतर इन्स्टाग्रामवर दोघांमध्ये एकमेकांच्या व्हिडिओवर कमेंट्स करणे, शिवीगाळ आणि धमक्या देण्याचे 'शीतयुद्ध' सुरू झाले.

हे ही वाचा : Maharashtra Weather : पावसाचा वेग मंदावला, मान्सून गायब होण्याची शक्यता?

मध्यरात्री कॅफेमध्ये रक्ताचा सडा

15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 3 ते 3.30 च्या सुमारास अथर्व जगताप एफसी रोड, शिरोळे रस्ता परिसरातील 'फ्लाईंग जिप्सी कॅफे'मध्ये गेला होता. योगायोगाने माधवी कुंभार आणि तिची मैत्रीण स्नेहल सोनके या देखील तिथेच होत्या. अथर्वला पाहिल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला. माधवीसोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलीने अथर्वला हटकले आणि त्याला शिवीगाळ सुरू केली.

यानंतर माधवीने फोन करून तिचे 15 ते 20 साथीदार कॅफेमध्ये बोलावून घेतले. या टोळक्याने अथर्वला सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर "याला जिवंत सोडायचं नाही, मारून टाका" असे म्हणत एकाने अथर्वच्या डोक्यावर आणि मानेवर कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अथर्वला तिथेच सोडून आरोपींनी पळ काढला. जखमी अथर्वला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे ही वाचा : Personal Finance: लग्नानंतर Joint Account की Separate Account.. नेमकं काय चांगलं?

कॅफे मालकाचा हलगर्जीपणा आणि पोलिसांची कारवाई

पुणे पोलिसांच्या नियमांनुसार रात्री उशिरापर्यंत कॅफे चालू ठेवण्यास मनाई असतानाही हा कॅफे पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे, कॅफे मालकाने पोलिसांना कोणतीही माहिती न देता जमिनीवर सांडलेले रक्त पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अथर्वचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर याप्रकरणी कठोर पावले उचलली आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

हे ही वाचा : फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याने महाराष्ट्रात चर्चांना उधाण; CM पदाबाबत अखेर स्वतःच सांगितलं!

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आणि वय

माधवी कुंभार (23 वर्षे), स्नेहल सोनके (20 वर्षे), राहुल मागमारे (20 वर्षे), शिवानंद तलवार (21 वर्षे), आदित्य भालेराव (22 वर्षे), प्रियांश भोसले (22 वर्षे), प्रेम साळवे (22 वर्षे)

अवघ्या 20 ते 23 वयोगटातील हे तरुण क्षुल्लक कारणावरून थेट जीवघेणे हल्ले करत आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. सोशल मीडियावरील लाईक्स, फॉलोवर्सची स्पर्धा आणि आभासी दुनियेपायी तरुणाई कशी चुकीच्या मार्गाला लागली आहे, हेच या दुर्दैवी घटनेतून पुन्हा एकदा उघड झाले आहे.