Crime news: उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये लग्नासाठी एका तरुणीला 1 लाख रुपयांमध्ये विकल्याचं प्रकरण समोर आलं आहे. प्रकरणातील पीडितेने अल्ताफ नावाच्या तरुणाने तिची लग्नासाठी विक्री केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात तीन व्यक्तींवर आरोप करण्यात आला असून ही घटना सत्यम नगर कॉलनी लंका भवनापुरची असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
ट्रेनमध्ये झाली तरुणाशी ओळख
पीडितेला करहल पोलीस स्टेशन परिसरात ठेवण्यात आलं असून त्यानंतर तिला लग्नासाठी कोर्टात नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं पीडितेनं सांगितलं. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, 9 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता पीडिता कायमगंजला तिच्या मोठ्या बहिणीच्या घरी जायला निघाली होती. त्यानंतर तिची ट्रेनमध्ये मिर्जापुरचा रहिवासी असलेल्या अल्ताफ नावाच्या तरुणाशी ओळख झाली. अल्ताफने तिच्याशी बोलण्यास सुरूवात केली आणि त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.
पीडितेनं पोलिसांना दिली माहिती
पोलिसांना माहिती देताना पीडिता म्हणाली, "आमचं बोलणं सुरू असताना अल्ताफने मला त्याच्यासोबत फर्रुखाबादला येण्यास सांगितलं. मी त्याच्या बोलण्यात आले आणि मग आम्ही आग्रा येथे उतरलो. पण आग्र्याहून कोणतंही वाहन उपलब्ध नसल्याने मी कायमगंजला जाण्यासाठी अल्ताफसोबत मैनपुरीला आले, अल्ताफ मला नातेवाईकांकडे घेऊन जात असल्याचं सांगून मैनपुरीला घेऊन गेला. तिथून तो मला करहल पोलीस स्टेशन परिसरातील हिम्मतपूर गावात तो घेऊन गेला. जिथे तो हृदेश नावाच्या मुलाशी माझ्या लग्नाबद्दल बोलू लागला."
हे ही वाचा: पहिल्या पत्नीला घटस्फोट, दुसऱ्या महिलेसोबत लग्न! आता थेट तिसऱ्या नवरीच्या शोधात... स्वत:च्या मुलीची सुद्धा पर्वा...
अल्ताफने 1 लाख रुपयांमध्ये विकलं
त्यानंतर, शहादतपूर येथील रहिवासी असलेला हृदेशचा नातेवाईक रामनिवास पाल यानेही पीडितेवर लग्नाची बोलणी करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. 11 ऑगस्ट रोजी या तिघांनी पीडितेला कोर्टात लग्न करण्यासाठी करहल तहसीलमध्ये नेले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिला अजिबात लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे तिने या सगळ्याला विरोध केला. तेव्हा अल्ताफने पीडितेला 1 लाख रुपयांमध्ये विकल्याचं रामनिवासने तरुणीला सांगितलं. त्या सगळ्या गोष्टींना विरोध करुन पीडिता कशी बशी त्यांच्या तावडीतून सुटून पळाली आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली.
हे ही वाचा: आरारारारा खतरनाक! 'ब्युटी पार्लरवाल्यांना नरकात पाठवा..', महिलेच्या भन्नाट मेकअपचा Viral Video पाहून नेटकरी भडकले!
पोलिसांचा तपास
पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी अल्ताफ, रामनिवास पाल आणि हृदेश यांच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तिघेही आरोपी सध्या फरार असून आरोपींना पकडण्यासाठी छापे टाकले जात आहेत. आतापर्यंत आरोपींच्या विरोधात कोणताही सुगावा लागलेला नाही. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला लवकरच अटक केली जाईल. तसेच, पीडितेची वैद्यकीय तपासणी देखील सुरू असून वैद्यकीय तपासणीनंतर तिला न्यायालयात हजर केलं जाईल.
ADVERTISEMENT
