Nagpur Crime : फ्रेंडशिप डेच्या दिवशीच एका मैत्रीचा नागपूर येथील कन्हान नदीच्या पात्रात अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी अंत झाला आहे. लग्न आणि मैत्रीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीला जुन्या रेल्वे पुलावरून थेट नदीत ढकलून दिले. या दुर्दैवी घटनेत प्रेयसीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, या घटनेमुळे नागपूर आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
लग्नावरुन वाद
या घटनेतील मृत तरुणीची ओळख 29 वर्षीय अश्विनी सुरेश डे अशी पटली आहे, तर आशीष मनपिया असे आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (2 ऑगस्ट) संध्याकाळी आरोपी आशीष हा अश्विनीच्या घरी गेला होता. त्यानंतर उशिरा रात्री सुमारे दीडच्या सुमारास दोघांमध्ये लग्न आणि त्यांच्यातील मैत्रीवरून जोरदार वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात आशीषने अश्विनीला जुन्या रेल्वे पुलावरून खाली नदीत ढकलून दिले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : पुणे मेट्रो : 254 मालमत्ता, शेकडो कोटींची मालमत्ता आणि ACB चिडीचूप
आरोपी कसा सापडला?
हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून तात्काळ फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपास, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. अखेर नागपूर शहरातील ऑटोमोबाईल चौक परिसरातून आरोपी आशीष मनपिया याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
हे ही वाचा : 25 वर्षीय तरुणाचा विवाहित महिलेवर जीव जडला, लग्नाला नकार देताच केलं भयानक कांड
दोघांविरोधातही गुन्हे
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपी आशीषविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्ह्यांचे सुमारे 10 गुन्हे दाखल आहेत. तसेच मृत अश्विनीवरही 2 गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. या प्रकरणी कन्हान पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












