nalasopara news : नालासोपारा पूर्वेतील दत्तनगर परिसरात बुधवारी सायंकाळी भरधाव कारने दोन महिला पादचाऱ्यांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी सायंकाळी सुमारे 4.45 वाजता घडली. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच अल्पवयीन मुलाला कार चालवण्याची परवानगी दिल्याचा आरोप असलेल्या वाहनमालकासह आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबई : नजर काढण्याच्या बहाण्याने घरात शिरला, बहुरुपी तृतीयपंथीयाचा महिलेवर लैंगिक अत्याचार
कारने दोघींना चिरडलं, एका महिलेचा मृत्यू
मृत महिलेचे नाव श्रेया मिसाळ (वय 32) असून जखमी महिलेचे नाव प्रगती मोरे (36) आहे. दोघीही नालासोपारा पूर्वेतील नागिंदास पाडा परिसरातील रहिवासी असून घरकाम करत होत्या. बुधवारी सकाळी त्या कामासाठी वसई येथे गेल्या होत्या. काम आटोपून नालासोपारा रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्या दोघी घरी जाण्यासाठी दत्तनगर परिसरातून पायी जात होत्या. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या राखाडी रंगाच्या मारुती ईको कारने त्यांना धडक दिली. या धडकेत दोघींनाही दुखापत झाली.
हेही वाचा : मुंबई : नजर काढण्याच्या बहाण्याने घरात शिरला, बहुरुपी तृतीयपंथीयाचा महिलेवर लैंगिक अत्याचार
प्रगती मोरे यांच्यावर उपचार सुरू
अपघातानंतर स्थानिकांनी दोन्ही महिलांना नायगावमधील नागिंदास पाडा येथील राकिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. श्रेया मिसाळ यांच्या डोक्याला, पाठीला, कंबरेला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असताना रात्री सुमारे 9.45 वाजता त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रगती मोरे यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातातील कारचा क्रमांक MH 48 CT 6433 असा आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही कार राजेश शाह यांच्या मालकीची असून महेश नाईक चालक होता. या दोघांनी अल्पवयीन मुलाला कार चालवण्याची परवानगी दिल्याचा आरोप आहे. तुळींज पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 106 (1), 125 (ब), 281 आणि 3 (5) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम 184, 181(4) आणि 180 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कारमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या. या बाटल्यांबाबत आणि अपघाताच्या परिस्थितीबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












