नांदेड : महापूरामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं आयुष्य उद्धवस्त झालंय. हातातोंडाशी आलेला घास महापूराने हेरावून घेतल्याने बळीराजा नैराश्यात गेल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नांदेडमधील एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर बापाचा देखील 12 तासांच्या मृ्त्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नांदेडशिवाय धुळ्यातील शेतकऱ्याने देखील कापसाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. निवृत्ती कदम असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे.
ADVERTISEMENT
धुळ्यात विषारी औषध पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या
अतिपावसाने कापसाचे पीक वाया गेल्याने नैराश्येत गेलेल्या एका शेतकऱ्याने शेवटी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याची हृदयद्रावक घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कुरखळी गावात घडली आहे. युवराज काशिनाथ कोळी या 40 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात फवारणीसाठी असलेले विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने केवळ कुरखळी गावातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे, शिरपूर तालुक्यात सहा दिवसात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
हेही वाचा : कल्याणमधील शाळेत कपाळावर टिळा अन् टिकली लावण्यास बंदी? चारी बाजूंनी टीका झाल्यानंतर शाळेचं स्पष्टीकरण
धुळ्यातील युवराज कोळी यांचा शेतीवरच उदरनिर्वाह होता, कापसाच्या पिकावर यावर्षी सुरुवातीला त्यांनी आपल्या क्षेत्रात कापसाची लागवड केली.परंतु गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या शेतातील पिके पूर्णतः पाण्याखाली गेली. फुलोरा व फळे गळून पडल्याने कापसाचे उत्पादन होणार नाही. हे स्पष्ट झाल्यावर कर्जाचे ओझे आणि पोटापाण्याची चिंता त्यांच्या मनावर दाटून आली, मुलींच्या लग्न कसं करावं? या नैराश्यग्रस्त अवस्थेत त्यांनी शेतातच फवारणीचे औषध प्राशन करून जीवन संपवले,
दरम्यान, सहा दिवसात शिरपूर तालुक्यात ही आत्महत्येची दुसरी घटना असून, यापूर्वी भाटपूरा येथील एका कर्जबारी तरुण शेतकऱ्याने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली होती, सलग दोन वेळा आत्महत्या झाल्याने शेतकऱ्यांच्या मानसिक स्थितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सरकारकडून पिकविमा आणि मदतीची आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात मदतीचा हात वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या घरात केवळ अश्रू आणि हतबलतेचे सावट आहे. युवराज कोळी यांच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांकडून शासनाने तत्काळ आर्थिक मदत जाहीर करून कुटुंबाला दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
नांदेडमधील शेतकऱ्यांची करुण कहाणी
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे. शेतात काही उरलं नाही, बँकेचं कर्ज आणि सावकारी कर्ज कस फेडावं या विवंचनेतून नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील तरुण शेतकरी निवृत्ती कदम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.मुलाने आत्महत्या केल्याने काही तासातच वडिलांनी देखील प्राण सोडले. या घटनेने नांदेड जिल्हा सुन्न झाला आहे. निवृत्ती कदम यांना तीन एकर जमीन होती. या तीन एकर मध्ये सोयाबीनचे पीक घेण्यात आलं होतं. शेतात आलेल्या सोयाबीनचे पीक या पावसामुळे मातीमोल झालं. मागील आठ दिवसापासून सातत्याने पाऊस सुरु होता. कदम हे दररोज शेताकडे जाऊन पीक पाहून विचार करायचे,बँकेचे एक लाख दहा हजार कर्ज,पेरणी साठी सावकाराकडून घेतलेलं कर्ज, लेकरांचं शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या विवंचनेतून निवृत्ती कदम या तरुण शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं.
वडील आणि आजोबा गमावलेल्या भगवान कदम या मुलाच्या डोळ्यातील अश्रूत सर्व काही सांगून जातात. राज्याचं मराठवाड्यात पावसाने कहर केला. राज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झालं. आता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. परंतु शासनाने हेक्टरी साडेआठ हजार रुपयाची तुटपुंजी मदत जाहीर केली. त्यामुळे आसमानी आणि आता सुलतानी संकटामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. शासनाने हेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ आर्थिक मदत देऊन संपूर्ण कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभाराव अन्यथा सरकारवरचा शेतकऱ्यांचा विश्वास उडेल अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. सरकारने तात्काळ मदत देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.
ADVERTISEMENT
