Crime News: वॉर्ड नगरसेवकाच्या मुलाने दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. 17 जानेवारी रोजी ही भीषण घटना घडली असून 22 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान, पीडितेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बिहारच्या पाटना येथील गोपालपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बेरिया गावात तिथल्या नगरसेवकाच्या मुलाने हे भयानक कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. मृत तरुणी ही 10 वीची विद्यार्थी होती आणि ती तिच्या आजीच्या घरी राहून शिक्षण पूर्ण करत होती. घटनेच्या दिवशी, पीडिता आपल्या आजीच्या घरातून तिच्या घरात परतत असताना, वॉर्ड नगरसेवक शंभू पासवान यांचा मुलगा आदित्य याने तिला रस्त्यात अडवलं आणि तिच्यासोबत भयानक कृत्य केलं.
ADVERTISEMENT
17 जानेवारी रोजी आरोपीने पीडितेला एका पिंपळाच्या झाडाजवळ रोखलं आणि तिच्याशी बोलण्याचा हट्ट करू लागला. त्यावेळी, पीडितेने नकार दिल्यावर आरोपीने आधी तिला धमकावलं आणि नंतर तिला एक फोटो दाखवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर, तिला जाळून टाकणार असल्याचं देखील त्याने सांगितलं.
प्रत्यक्षदर्शी आणि कुटुंबीयांचा जबाब
प्रत्यक्षदर्शी आणि कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, वाटेत दोघांमध्ये वाद सुरू असताना आरोपीने मुलीवर पेट्रोल ओतलं आणि पेटलेली काडी तिच्यावर फेकून तिला जिवंत जाळलं. आग लागताच, मुलगी ओरडत ओरडत सुमारे 150 फूट रस्त्यावर धावत गेली आणि काही अंतर गेल्यावर ती खाली कोसळली. तरुणीची परिस्थिती पाहून स्थानिक मदतीला धावले आणि त्यांनी कशीबशी आग विझवली. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत पीडितेला पाटण्यातील नालंदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (एनएमसीएच) मध्ये दाखल केलं.
हे ही वाचा: आजारी मेहुणी घरी एकटी असल्याचं कळताच अचानक घरात घुसला अन् बळजबरीने घृणास्पद कृत्य...
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पीडितेचं शरीर जवळजवळ पूर्णपणे जळालं होते आणि ती गेल्या सहा दिवसांपासून तिच्या जीवाशी झुंज देत होती. मात्र, 22 जानेवारी 2026 च्या रात्री तिच्या शरीरावरील गंभीर जखमांमुळे तिचा मृत्यू झाला. पोलिसांना दिलेल्या जबाबात, तरुणीने संपूर्ण घटनेचं वर्णन केलं. तिने सांगितलं की आरोपीने आधी तिच्यावर पेट्रोल ओतलं, नंतर माचीसची काडी तिच्यावर फेकून तिला जाळलं. आग लागताच ती वेदनेने ओरडली आणि रस्त्यावर पळत सुटली. त्यानंतर, काही अंतरावर ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली.
तरुणीचे वडील दिलीप कुमार यांनी सांगितलं की, त्यांची मुलगी दररोज शाळेत जात असताना आरोपी आदित्य तिला नेहमी त्रास द्यायचा. ते म्हणाले की, "माझ्या मुलीला फक्त अभ्यास करायचा होता, पण आरोपीने तिचा साधेपणा आणि शांतता तिची कमजोरी मानली." या घटनेनंतर, आरोपी आदित्य फरार होता, त्यानंतर त्याने पाटणा शहर न्यायालयात आत्मसमर्पण केलं.
ADVERTISEMENT











